हिंदुस्थानी कारनिर्मात्या कंपन्यांची परदेशात चांदी

346

हिंदुस्थानी मोटारनिर्मिती कंपन्यांना यंदाच्या वर्षीच्या सुरुवातीला मोठे नुकसान सहन करावे लागले. बाजारात मोटारकारना मागणी घटल्याने मारुती सुझुकीपासून टोयोटा किर्लोस्कर या कंपन्यांना काही काळासाठी कारनिर्मिती थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. देशात मागणी घटली असली तरी परदेशात मात्र हिंदुस्थानी कारनिर्मात्या कंपन्यांची चांदी झाली. कार निर्यातीमध्ये साडेसहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले.

एप्रिल ते ऑगस्ट या काळात देशी बाजारात कारना मागणी घटल्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी सवलती देऊ केल्या होत्या. परंतु त्यानंतरही कार विक्रीमध्ये 29.4 टक्के घट झाली. मात्र त्याच कालावधीत निर्यात वाढल्याने कंपन्यांना समतोल राखता आला. कार निर्यातीमध्ये 6.5 टक्क्यांनी वाढ झाली. दुचाकींच्या विक्रीमध्येही हाच अनुभव आला. स्वदेशी बाजारात दुचाकींच्या विक्रीत 14.85 टक्क्यांनी घट झाली पण निर्यातीमध्ये 4.52 टक्के वाढ झाली.

स्वदेशी बाजारात मागणी घसरली तर निर्यातीसाठी आणखी चांगल्या दर्जाच्या गाडय़ांची निर्मिती करता येईल अशा पद्धतीनेच बहुतांश कार निर्मात्या कंपन्यांनी आपल्या प्रकल्पांमध्ये यंत्रणा बनवली आहे. सध्या आफ्रिकेमधून हिंदुस्थानी कारना मागणी वाढली आहे. तिथे कारनिर्मात्या कंपन्यांची संख्या अगदीच कमी आहे.

अशी झाली वाढ
जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत हुंदई मोटर्सच्या निर्यातीमध्ये 15.84 टक्के वाढ झाली. हुंदईच्या 1 लाख 22 हजार 518 गाडय़ांची निर्यात झाली. गेल्या वर्षी हाच आकडा 1 लाख 5 हजार 768 इतका होता. निस्सान कंपनीची निर्यात 27 टक्के, टोयोचा किर्लोस्करची 21 टक्के, वोक्सवॅगनची 7.3 टक्के, मारुती सुझुकीची 4.4 टक्के आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्राची निर्यात 42.3 टक्के वाढली.

आपली प्रतिक्रिया द्या