देसी चायनिज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
दमा किंवा श्वसनविकार असलेल्या रुग्णांमध्ये अजिनोमोटो अन्नपदार्थांद्वारे शरिरात गेल्यास श्वसननलिका सुजते व त्यातून कोणत्याही क्षणी दम्याचा झटका येण्याची शक्यता असते.

>> मीना आंबेरकर

चायनीज कुकरी हल्ली खूप लोकप्रिय झालेली आहे. सर्वत्र चायनीज आहारगृह निघालेली आढळून येतात. तसेच रस्तोरस्ती चायनीज पदार्थ गाडय़ावर विकायला आलेले दिसून येतात. बच्चा कंपनी व युवाकंपनीतही चायनीज खूप आवडीने खाल्ले जाते. परंतु नेहमीच हॉटेलमध्ये चायनीज खायला जाणे सामान्यांना परवडत नाही आणि हॉटेलहून स्वस्त दरात मिळणारे चायनीज आरोग्याच्या दृष्टीने कितपत हितावह आहे हे सांगणे कठीणच म्हणून मग घरीच चायनीज बनवणे हितकारक ठरते. चायनीज चविष्ट तर आहेच, परंतु इतर आहार संस्कृतीच्या दृष्टीने तितकस महाग नाही. तसेच समतोल आहाराला आवश्यक ते बहुतेक घटक चायनीजमध्ये यथायोग्य प्रमाणात आहेत. मांस, मासे, अंडी ही प्राणिज प्रथिनं आहेत जीवनसत्वासाठी भरपूर ताज्या भाज्या आहेत. भाज्या अगदी बेताच्याच शिजवल्यामुळे जीवनसत्व बरीचशी शाबूत राहतात. भात, नूडल्स वगैरे पिष्टमय पदार्थांचाही योग्य तितका वापर केला जातो. स्वयंपाकाचं माध्यम म्हणून बहुतेकवेळा तूप, लोणी, चरबी यांऐवजी वनस्पतीजन्य तेल वापरलेलं असत. त्यामुळे कॉलेस्टेरोलची संभाव्यता कमी राहते यासर्व गोष्टींमुळे चायनीज हे आहारशास्त्राच्या दृष्टीने फायदेशीर आहे. गृहिणींना घरच्या घरी चायनीज बनवण्यासाठी आज आपण काही चायनीज पाककृतींची ओळख करून घेणार आहोत

fried-rice-f

चायनीज फ्राईड राईस

साहित्य…पुलाव राईस 2 वाटय़ा, रिफाईंड तेल, अर्धी वाटी गाजराचे लांबट तुकडे, अर्धी वाटी फरसबी लांबट चिरलेली, अर्धी वाटी कांदेपात, चिकन उकडलेले तुकडे 100 ग्रॅम, उकडलेली कोलंबी 50 ग्रॅम, 2 अंडी, काळी मिरी, 7-8 दाणे काळी मिरपूड, पाव चमचा मीठ, 1 टे.स्पून टोमॅटो केचप, 2 टे.स्पून, सोया सॉस 1 टे.स्पून.

कृती...तांदूळ धुवून निथळत ठेवा. पातेल्यात तेल तापवून काळी मिरी फोडणीला घालून तांदूळ घाला. परतून घ्या. मीठ व 4 वाटय़ा गरम पाणी घालून भात शिजवा. भात मोकळा व सडसडीत हवा. नंतर तो परातीत उपसून ठेवा. फ्राय पॅनमध्ये तेल तापवून भाज्या थोडय़ा परता, मीठ व मीरपूड, थोडे पाणी घालून अर्धा कच्च्या शिजवा. मग बाजूला काढून ठेवा. त्याच भांडय़ात चिकन, कोळंबी, भाज्या, भात, सोयासॉस टोमॅटो केचप घालूनसारखे ढवळा. झाकण ठेवून 10 मिनिटे चुलीवर ठेवा व नंतर सर्व्ह करा. झाकण ठेवण्यापूर्वी त्यात दोन अंडी फोडून घाला व हलकेच मिसळा.

veg-us
अमेरिकन चॉप्सी

साहित्य…2 वाटय़ा उभा चिरलेला कोबी, 7-8 फरसबीच्या शेंगा, 2 सिमला मिरच्या, 2 ते 3 सफेत कांदे, अर्धा टे.स्पून मिरीपूड, अर्धा वाटी कांदापात, अर्धा वाटी मोड आलेले मूग, 2 गाजर, 1 वाटी बोनलेस चिकन (बॉईल), 1 पॅकेट नूडल्स, 3 ते 4 टे.स्पून टोमॅटो सॉस, 2 टे. स्पून चिली सॉस, 4 कप चिकन स्टोक, 2 टे.स्पून कॉर्नफ्लोअर, 2 टे.स्पून तेल 1 प्लेन ऑमलेट, अर्धा टे.स्पून अजिनोमोटो, मीठ चवीप्रमाणे, 2 टी स्पून व्हिनीगर, 3 टे.स्पून साखर, ऑरेंज कलर.

कृती…एका पातेल्यात मीठ व पाणी उकळून घेतल्यानंतर त्यात नूडल्स टाका. चमच्याच्या टोकाने मोकळ्या करून गॅस बंद करा. लगेच चाळणीत काढून झाकून ठेवा. साधारण 15 ते 20 मिनिटांनी त्याचे 12 ते 15 भाग करून थोडे हातानी दाबून गोल चपटे गोळे करा व तेलात तळून घ्या. नूडल्स कुरकुरीत व सॉफ्ट होतील. उरलेल्या वेळात कांदा गोल चिरून टाका. मोकळा झाल्यावर मोड आलेले मूग, उभी चिरलेली फरसबी, उभी चिरलेली सिमला मिरची टाका. नंतर त्यात टोमॅटो सॉस, चिली सॉस टाकून परतून घ्या. नंतर कोबी, चिकनचे लहान तुकडे, मीठ, मीरपूड, अजिनोमोटो टाकून परतून घ्या. मग चिकन स्टॉक, साखर टाका. उकळी आल्यानंतर कॉर्नफ्लोअर व ऑरेंज कलर याची पेस्ट टाका व घोटत रहा. घट्ट होऊन चकाकी आल्यानंतर गॅस बंद करा. सर्व्ह करताना बाऊलमध्ये तयार भाजी, त्यावर क्रिस्पी तळलेल्या नूडल्स टाका. नंतर ऑमलेटची पट्टी टाका. व्हिनीगर टाका.

manchurin-f

चिकन मंच्युरिअन

साहित्य...1 लहान बोनलेस चिकन, 2 अंडी, 2 टे.स्पून कॉर्नफ्लोअर लागल्यास थोडा मैदा, थोडे मीठ, थोडी मिरीपूड, 1 टे.स्पून सोया सॉस, 8 ते 10 हिरव्या मिरच्या, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1 ते दीड उंच आले, अर्धा टीस्पून अजिनोमोटा, 2 टे.स्पून सोया सॉस, 2 कप चिकन स्टॉक, 2 टे.स्पून तेल, मीठ चवीप्रमाणे.

कृती...एका बाऊलमध्ये अंडी, मीठ, मिरीपूड, अजिनोमोटो व सोया सॉस फेसून त्यात कॉर्नफ्लोअर टाका व एकत्र करा. सैल वाटल्यास मैदा टाका. त्यात चिकन तुकडे टाकून 10 ते 15 मिनिटे ठेवा. नंतर तेलामध्ये मोठय़ा गॅसवर ते चिकनचे तुकडे पेस्टसकट टाकून भराभर तळून घ्या. 3 ते 4 टे.स्पून तेलात आले-लसूण बारीक कापून टाका. गुलाबी झाल्यावर तळलेल्या चिकनचे तुकडे टाकून परतून घ्या. वरून सोयासॉस अजिनोमोटो टाकून गॅस बंद करा. वरून सेलरी किंवा कोंथिबीर कापून टाका. ग्रेव्ही करताना आले-लसूण गुलाबी झाल्यावर त्यात स्टॉक टाका. मीठ, सोया सॉस टाकून उकळी काढा. नंतर त्यात तळलेले चिकन टाका. 5 ते 7 मिनिटे उकळून त्यावर कॉर्नफ्लोअर पेस्ट टाका. घट्ट होऊन चकाकी आल्यावर व्हिनीगर व कोंथिबीर टाका.

veg-noodles

व्हेज नूडल्स

साहित्य…200 ग्रॅम नूडल्स, 2 वाटय़ा उभा चिरलेला कोबी, 2 सिमला मिरच्या, 2 गाजर, 8 ते 10 फरसबीच्या शेंगा, 2 टे.स्पून सोया सॉस, अर्धा वाटी कांदा पात, 1 टे.स्पून तेल, 3 ते 4 सफेत कांदे, 1 टे.स्पून चिली सॉस, चवीप्रमाणे मीठ, 2 टे.स्पून व्हिनीगर, 1 टे.स्पून मीरपूड.

कृती...नूडल्स बुडतील एवढे पाणी मोठय़ा पातेल्यात उकळत ठेवा. त्यात मीठ व नूडल्स टाका. हलके हलवून 2 ते 3 मिनिटे गॅस चालू ठेवा. झाकण ठेवून गॅस बंद करा. 5 ते 7 मिनिटांनी नूडल्स चाळणीत टाकून थंड पाण्याने नळाखाली धुवून घ्या. व्यवस्थित निथळल्यावर कढईत तेल टाकून ते तेल कढईला लावून घ्या. त्यात कांदा उभा चिरून टाका. मोकळा झाल्यावर फरसबी, सिमला मिरची उभी लांब कापून टाका. त्यात सोया सॉस, चिली सॉस व मिरीपूड टाकून परतून घ्या. नंतर कोबी, मीठ टाका, एकत्र करून मोकळ्या केलेल्या नूडल्स टाकून एकत्र करा.गॅस बंद करा. नंतर त्यात व्हिनीगर, गाजर व कांदापात टाकून एकत्र करा.