
आसावरी जोशी,[email protected]
सुमेधा-योगेश चिथडे… गेल्या २० वर्षांपासून हिंदुस्थानी लष्करासाठी निरपेक्ष वृत्तीने फूल ना फुलाची पाकळी कार्यरत आहेत… आता सियाचीनच्या आपल्या जवानांसाठी श्वासांची अनमोल भेट घेऊन निघाले आहेत…
आपण सगळीच जणं कशासाठी जगतो… स्वतःसाठी… स्वतःच्या कुटुंबासाठी… मुलाबाळांसाठी… एक छान… सुरक्षित… ऊबदार… निर्वेध… निर्विघ्न जीवन मिळावं म्हणून आपल्या सगळ्यांचीच धडपड, धांदल सुरू असते. चुकीचे काय असते त्यात…? अगदी रास्तच आहे. कामाच्या ठरावीक वेळा… आठवडय़ातून किमान एक दिवस तरी सुट्टी… कामाव्यतिरिक्त कुटुंबीयांसमवेत द्यावासा वाटणारा वेळ, आर्थिक सुरक्षितता… ऐटबाज राहणीमान… प्रशस्त घर… किमान टॉवरमध्ये… व्हिला, बंगला झाला तर हवेच आहे… आपल्यापैकी सगळ्यांच्याच आयुष्याची इतिकर्तव्यता यातच असते… अगदी सामान्यांपासून… ते देशप्रेमाची आणि देशाप्रती, समाजाप्रती बांधिलकीची ग्वाही देणाऱया राजकीय दिग्गजांपर्यंत… नाही का…
पुण्यातील एक तुमच्या आमच्यासारखेच मध्यमवर्गीय कुटुंब. सुमेधा आणि योगेश चिथडे. सुमेधा चिथडे निवृत्त शिक्षिका… योगेश चिथडे वायुदलातील निवृत्त अधिकारी… गेल्या २० वर्षांपासून या दांपत्याने एकच ध्यास घेतला आहे आपल्या हिंदुस्थानी लष्करासाठी… पर्यायाने देशासाठी काहीतरी करण्याचा… छत्रपती शिवराय आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्यंतिक प्रभावाखाली.
युद्धभूमी सियाचीन
सियाचीन… जगातील सर्वात उंचावर असलेली युद्धभूमी. बर्फाच्या पर्वतरांगा… गोठवणारं तापमान… काकूंच्याच शब्दात येथे प्रत्येक श्वासाची किंमत अनमोल आहे. ही युद्धभूमी ७० किलोमीटर लांब आहे. वर्षाचे १२ महिने, ३६५ दिवस आणि २४ तास येथे केवळ बर्फाच साम्राज्य. येथे दिवसाचे तापमान
– ४० अंश सेल्सिअस आणि रात्री -७० अंश सेल्सिअस. जगातील दुसरा मोठा ग्लेशियर. एकीकडून पाकिस्तान आणि दुसरीकडून चीन अशा आपल्या कट्टर शत्रूंना मात देत हिंदुस्थानी लष्कर सियाचीनमध्ये १५० छावण्यांसहीत अहोरात्र उभे आहे. येथे एकूण १० हजार सैन्य तैनात आहे.
विशेष प्रशिक्षण
सर्वसाधारणतः सियाचीनवर लष्करी जवानांची ३ महिन्यांसाठी बदली असते. या तीन महिन्यांसाठी प्रत्येकाला पाच आठवडय़ांचे खास प्रशिक्षण घ्यावे लागते. हा तीन महिन्यांचा कालखंड मोठा खडतर असतो. येथे तैनात जवानांना तीन महिने ना आंघोळ करता येत, ना दाढी करता येत. प्रत्येक रात्री आपल्या छावणीसमोरील बर्फाचा निचरा करावा लागतो. पाणी पिण्यासाठी बर्फ वितळावा लागतो. एका ठरावीक गोळीच्या सहाय्याने ते पाणी पिण्यालायक बनते. या खडतर परिस्थितीमुळे हिंदुस्थानी जवानांना हायपोक्सिया, हाय एल्टीटय़ुड एडीमसारखे विकार जडण्याची भीती असते. या विकारात फुफ्फुसात पाणी भरून अवयव बधीर होतात.
या सगळ्या प्रतिकुलतेवर मात करत हसतमुखाने आपला हिंदुस्थानी जवान सियाचीनचे रक्षण प्राणपणाने करतो आहे. येथे आपली तटबंदी एवढी मजबूत आहे की ती गेल्या 30 वर्षांपासून पाकिस्तान किंवा चीन भेदू शकलेला नाही.

२० वर्षांपासून काम सुरू
येथे आपल्या सगळ्यांचाच ऊर अभिमानाने भरून येतो. पण कुठेही काही वाच्यता न करता चिथडे दांपत्य आपल्या जवानांसाठी श्वासांची अनमोल भेट घेऊन जाणार आहेत. यासाठी काकूंनी आपले दागिने मोडून पैसे जमवले आहेत.
अगं आमच्या गरजा खूप कमी आहेत. त्या भागवून उरलेले पैसे आम्ही आपल्या देशासाठी खर्च करण्याचे २० वर्षांपूर्वीच ठरविले आहे. पुण्याच्या खडकीतील अपंग जवानांसाठी काम करण्यापासून आम्ही सुरुवात केली. आपले हिंदुस्थानी सैन्य खूप प्रतिकुलतेत आपली कर्तव्यं पार पाडत असते. जेव्हा आपण घरी सुरक्षित वातावरणात सणवार साजरे करीत असतो तेव्हा ते बंदुका रोखून सीमेवर सज्ज असतात. काकू पोटतिडकीने सांगत होत्या. मी त्यांची कौटुंबीक परिस्थिती खूप जवळून पाहिली आहे. या जवानांच्या पत्नी, कुटुंबीय यांच्यात शिक्षणाचा अभाव असतो. कायद्याची, अधिकाराची काहीही जाणीव नसते त्यांच्यासाठी आम्ही काम करायला सुरुवात केली.
श्वासांची भेट
गेली चार-पाच वर्षे मी आणि काका सियाचीनचा अभ्यास करतोय. येथे सगळ्यात महागडी गोष्ट कोणती असे तर ती आहे श्वास. या जवानांच्या श्वासासाठी आम्ही ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे ठरवले आहे. यासाठी खर्च आहे एक कोटी दहा लाख रुपये. आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांसाठी ही रक्कम अर्थातच खूप जास्त आहे. पण आम्ही आमच्याकडची सगळी पुंजी यात घातली आहे. उरलेला फंड जमा करण्याचे काम सुरू आहे.
काकू सांगतात, आम्हाला बऱयाचदा सांगितले जाते की सैन्यासाठी काही करण्याची जबाबदारी शासनाची आहे. शासनाची किंवा कोणत्याही राजकीय पक्षाची जबाबदारी काय आहे याची चिकित्सा आम्हाला करायची नाही. आम्हाला आमच्या जवानांबद्दल आत्मियता, तळमळ वाटते म्हणून आमचे त्यांच्यासाठी फूल ना फुलाची पाकळी प्रयत्न सुरू आहेत.
सैन्यात भरती व्हा!
आपले सैन्य ही आपल्या देशाची शान आहे… अभिमान आहे. यासाठी चिथडे काका-काकू तरुण पिढीला लष्करी प्रशिक्षणाकडे आकृष्ट करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. आपल्याकडे लष्करी प्रशिक्षण सक्तीचे व्हावे असे काकूंना वाटते. त्यामुळे तरुण पिढीच्या बेबंद जगण्याला शिस्त लागेल. आपले देशप्रेम हे केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीपुरते मर्यादित राहू नये.
शासनाची किंवा राजकीय पक्षांची काय जबाबदारी आहे यावर ऊहापोह करीत बसण्यापेक्षा आपण सामान्य माणसं एकमेकांशी जोडले जाऊया. आपण जबाबदारीने वागूया. तरुणाईने छान व्यायाम करावा, शरीर कमवावे, लष्करात जावे, देशाच्या उपयोगी पडावे…
किती सहज सोपी जगण्याची सूत्रं काकू सांगत होत्या. मधून काकांनी सांगितले की, तिहार तुरुंगातील कैद्यांना रोजच्या जगण्यासाठी ११२ रुपये भत्ता दिला जातो… आणि आपल्या जवानांना फक्त ९७ रुपये. खरंच विचार करण्यासारखी आहे ही विसंगती… आपल्या जगण्यातील खारीचा वाटा आपल्या देशासाठी देऊन पाहूया… किती मानसिक समाधान मिळते ते. स्वतःसाठी जगायचे आहेच… थोडे देशासाठीही जगूया…
हिंदुस्थानी लष्कराची अनमोल वचनं
मी तिरंगा फडकवून परत येईन किंवा तिरंग्यात विसावून परत येईन, पण परत नक्की येईन….कॅप्टन विक्रम बत्रा (परमवीर चक्र)
जे तुमच्यासाठी असाधारण शौर्य आहे ते आमच्यासाठी रोजचे जगणे आहे….हिंदुस्थानी लष्कर
जर माझे शौर्य सिद्ध करण्यापूर्वी मला मृत्यू आला तर मी शपथ घेतो की मी मृत्यूलाच संपवेन….कॅप्टन मनोजकुमार पांडे (परमवीर चक्र)
आपला तिरंगा हवेमुळे फडकत नाही, तर त्यात आपल्या सैनिकांचे श्वास आहेत…हिंदुस्थानी लष्कर
ईश्वर आमच्या शत्रूवर दया करो. कारण आमच्याकडे देशाच्या शत्रूसाठी दयामाया नाही…हिंदुस्थानी लष्कर
जर कुणी व्यक्ती असा दावा करीत असेल की त्याला मृत्यूचे भय नाही, तर एक तर तो खोटं बोलत असेल किंवा मग तो हिंदुस्थानी जवान असेल….फिल्डमार्शल सॅम माणेकशॉ
दहशतवाद्यांना क्षमा करणे इश्वराचे काम आहे. पण त्यांची इश्वरासोबत भेट घालून देणे हे आमचे कर्तव्य आहे…हिंदुस्थानी लष्कर
मला वाईट वाटते की देशासाठी खर्ची घालायला माझ्याकडे एकच जन्म आहे….प्रेम रामचंदानी (लष्करी अधिकारी)























































