India-Taliban Relations – ऑपरेशन सिंदूरनंतर कटुता निर्माण करण्याचा पाकचा डाव फसला, हिंदुस्थान-अफगाणिस्तानची मैत्री कायम

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुरुवारी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी चर्चा केली. यादरम्यान, हिंदुस्थान-अफगाणिस्तान यांच्यातील पारंपरिक मैत्री, विकास सहकार्य आणि अलिकडच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध यासारखे मुद्दे प्रमुखतेने उपस्थित करण्यात आले. तसेच अफगाणिस्तान आणि हिंदुस्थान दोन्ही देशांमधील अविश्वास निर्माण करण्याच्या पाकच्या प्रयत्नांना अफगाणिस्तानने दुजोरा दिलेला नाही. यासाठी हिंदुस्थानने त्यांना पाठिंबा दिला.

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार एस जयशंकर आणि अमीर खान मुत्ताकी यांच्या फोनवर संवाद झाला. यावेळी जयशंकर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुत्ताकी यांनी केलेल्या निषेधाचे खूप कौतुक केले. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीच्या वृत्तांचा संदर्भ दिला. या वृत्तात हिंदुस्थानने पहलगाम हल्ल्याच्या वेळी तालिबानच्या कांद्यावर बंदूक ठेऊन ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला, असा खोटा दावा पाक मीडियाने चालवला होता. यादरम्यान दोन देशात कटुता निर्माण करणाऱ्या दाव्यांच्या प्रयत्नांनाना अफगाणिस्तानने धुडकावून लावले. त्यामुळे तुमच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे एस जयशंकर म्हणाले.

दरम्यान, एस जयशंकर यांनी “अफगाणिस्तानातील लोकांशी असलेली आमची पारंपारिक मैत्री आणि त्यांच्या विकासाच्या गरजांसाठी असलेला हिंदुस्थानचा पाठिंबा यावर चर्चा केली. तसेच दोन्ही देशांकडून मिळणारे सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये झालेली ही चर्चा सार्थकी लागली असे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले. जरी दोन्ही देशांत महत्त्वाच्या घटकांवर चर्चा झाली असली तरी हिंदुस्थानने अद्याप तालिबान राजवटीला मान्यता दिलेली नाही.