
आयुर्वेद डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय वादात सापडला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने निर्णयाला तीव्र विरोध करीत लाक्षणिक संप पुकारला आहे. 11 डिसेंबरला कोविड व अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त अन्य कामे, शस्त्रक्रिया केल्या जाणार नाहीत. हा आधुनिक औषधांसाठीचा ’स्वातंत्र्य संग्राम’ आहे, असा इशारा असोसिएशनने दिला आहे.
येत्या 11 डिसेंबरला सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत संप पुकारला जाईल. या दिवशी आयसीयू, सीसीयू याबरोबरच कॅज्युअल्टी, लेबर रूम्स, इमर्जन्सी सर्जरीचे कामकाज सुरू राहील. मात्र इलेक्टिव्ह सर्जरी केल्या जाणार नाहीत, असे असोसिएशनने आपल्या पत्रकात म्हटले आहे.
सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन कायद्यातील सुधारणेची अधिसूचना चुकीची आहे. आयुर्वेदातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्याचा निर्णय म्हणजे वैद्यकीय शिक्षणाचे खिचडीकरण आहे.
केंद्र सरकारने त्याच दिशेने टाकलेले पाऊल आहे, असा दावा असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी मंगळवारी केला. केंद्र सरकारने संबंधित अधिसूचना तातडीने मागे घ्यावी, निती आयोगाच्या चार समित्या बरखास्त कराव्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.





















































