
अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. ट्रम्प सरकारने अमेरिकेतील नियमांमध्ये बदल केल्यापासून दिवसेंदिवस तिथल्या हिंदुस्थानींचे जगणे कठीण झाले आहे. अशातच आता आणखी एका गुन्हाची नोंद झालीए. अमेरिकेतील डलासमध्ये एका हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली असून हिंदुस्थानी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 10 सप्टेंबर रोजी टेक्सासमधील डलासमधील डाउनटाउन सूट्स मोटलमध्ये घडली. येथे हिंदुस्थानी वंशाच्या 50 वर्षीय चंद्रमौली नागमल्लैया यांची त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या समोरच कुऱ्हाडीने मानेवर वार करून हत्या करण्यात आली. डलास पोलिसांनी या हत्या प्रकरणात आरोपी योर्डानिस कोबोस-मार्टिनेझला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रमौली नागामल्लैया हे त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत मोटलमध्ये होते. तेव्हा त्यांनी योर्डानिस कोबोस-मार्टिनेझ आणि त्यांच्या महिला सहकाऱ्याला खराब वॉशिंग मशीन वापरू नका असे सांगितले. यावर योर्डानिस कोबोस-मार्टिनेझला राग आला. कारण नागामल्लैय्याने त्याच्या महिला सहकाऱ्यामार्फत त्याच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आरोपी योर्डानिस रागाच्या भरात खोलीतून बाहेर आला. त्याने चाकू काढला आणि चंद्रमौलीवर हल्ला केला.
नागमल्लैयाने मदतीसाठी ओरडत मोटलच्या पार्किंगकडे धाव घेतली, मात्र योर्डानिस कोबोस-मार्टिनेझ त्याचा पाठलाग करत त्याच्यावर कुऱ्हाडीने वारंवार हल्ला केला. यावेळी नागमल्लैया यांची पत्नी आणि मुलाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र योर्डानिसने त्यांना देखील ढकलून दिले आणि नागमल्लैयावर कुऱ्ह्याडीने सपासप वार केले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. यानंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र डलास अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आरोपीचा पाठलाग केला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान पोलीस यासंदर्भात सखोल चौकशी करत आहेत. आरोपींना लवकरच शिक्षा होईल असे आश्वासन दिले आहे.