पंजाबच्या महिलेची न्यू जर्सीमध्ये गोळ्या झाडून हत्या, आणखी एक गंभीर

 

अमेरिकेतील न्यू जर्सीच्या मिडलसेक्स काउंटीमध्ये झालेल्या गोळीबारात एका हिंदुस्थानी वंशाच्या महिलेचा मृत्यू झाला, तर सोबतची व्यक्ती देखील गंभीर जखमी झाली आहे.

स्थानिक पोलीस घटनेचा तपास करत असून संशयिताची ओळख 19 वर्षीय गौरव गिल अशी सांगण्यात येत आहे. तोही हिंदुस्थानी वंशाचा असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मृत्युमुखी पडलेली महिला ही पंजाबमधील होती. बुधवारी (14 जून) गोळीबारात गंभीर जखमा झालेल्या दोन महिलांचा शोधण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोन्ही पीडितांना गंभीर अवस्थेत विमानानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गंभीर जखमा आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या रक्तस्रावामुळे जसवीर कौर (29) चा मृत्यू झाला, तर तिच्या 20 वर्षीय चुलत बहिणीची प्रकृती गंभीर आहे.

त्याच दिवशी संशयित गौरव गिल याला अटक करण्यात आली. शूटिंग साइटपासून अर्ध्या मैल अंतरावर असलेल्या एका जागेत पोलिसांनी त्याला पकडले. केंटमधील रहिवासी असलेल्या गिलवर फर्स्ट-डिग्री खून, खुनाचा प्रयत्न आणि अनेक शस्त्रासंबंधी गुन्ह्यांसह अनेक आरोप आहेत.

ज्या घरामध्ये या दोन्ही महिला राहत होत्या ते घर गुरुमुख सिंग यांच्या मालकीचे आहे, ज्यांनी कौर ही एक मेहनती आणि प्रेमळ व्यक्ती असल्याचे सांगितले.

गोळीबारामागील हेतू अद्याप अस्पष्ट आहे असून गिलचा या पीडितांशी आधी कधी संपर्क झाला होता का हे पोलिसांना अद्याप स्पष्ट नाही.

न्यूयॉर्कमधील हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासाने X वर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महिलेच्या मृत्युवर शोक व्यक्त केला असून जखमी महिला लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली आहे. तसेच लागेल ती सर्व मदत करण्याची तयारी दर्शवल आहे.

यामागील कारण शोधण्यासाठी कसून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.