कर्तव्यावर असलेल्या हिंदुस्थानी तरुण कामगाराचा सौदी अरेबियातील रुबा अल-खली वाळवंटात अडकल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. शाहबाज खान असे मयत तरुणाचे नाव असून मूळचा तेलंगणातील रहिवासी आहे. शाहबाज हा गेल्या तीन वर्षांपासून सौदी अरेबियात काम करत होता. खान अल हासा भागातील एका टेलिकॉम कंपनीत टॉवर टेक्निशियन म्हणून तो कामाला होता.
पाच दिवसांपूर्वी शाहबाज एका सहकाऱ्यासोबत रुबा अल-खली वाळवंटात नेहमीच्या कामावर गेला होता. वाळवंटात गेल्यानंतर त्यांचे GPS बिघडले. त्यामुळे ते दिशा भरकटले आणि वाळवंटाच्या मध्यभागी पोहचले. त्यातच दुर्दैवाने त्यांच्या वाहनातील इंधनही संपले. त्यामुळे दोघेही तेथे अडकले. विस्तीर्ण अशा वाळवंटात मदतीची कोणतीही आशा नाही. फोनला सिग्नल नसल्याने मदतीसाठी कुणाशीही संपर्क साधता आला नाही.
पाच दिवस वाळवंटातील कडक ऊन्हामुळे आणि अन्न-पाणी न मिळाल्याने दोघांचा मृत्यू झाला. दोघेही परत न आल्याने आणि त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने कंपनीने ते बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी दोघांची शोध मोहीम सुरू केली. अखेर वाळवंटात त्यांचे निर्जीव मृतदेह सापडले. रुबा अल-खली वाळवंटाला एम्प्टी क्वार्टर असेही म्हटले जाते. चार देशांमध्ये हे वाळवंट पसरले असून कुप्रसिद्ध आहे. येथे हरवलेल्यांना शोधणे जवळजवळ अशक्यच आहे.