हिंदुस्थानचा विंडीजवर दणदणीत विजय, ‘फिरकीपटू’ दीप्तीच्या 10 धावांत 4 विकेट

335

हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघांमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात हिंदुस्थानने विंडीजचा धुव्वा उडवला. दुसऱ्या लढतीत हिंदुस्थानने विंडीजवर 10 गडी राखून मात केली आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. ऑफस्पिनर दीप्ती शर्माच्या भन्नाट फिरकीपुढे कॅरेबियन महिला पार गळपटल्या. दीप्तीने 10 धावा मोजत 4 फलंदाज बाद केले.

विंडीजच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्यांच्या फलंदाजांनी कर्णधाराची पार निराशा केली. सलामीवीर स्टेसी किंग (7), शेरमाईन कॅम्पबेल (0) या दोघी झटपट बाद झाल्या. सलामीवर हेले मॅथ्यूज आणि छीडन नेशन या दोघींनी सावध खेळ करत चांगली कामगिरी केली. त्या दोघींनी दमदार भागीदारी रचायला प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नाला मॅथ्यूज बाद झाल्यावर खीळ बसली. मॅथ्यूजने 2 चौकार लगावत 35 चेंडूंत 23 धावा केल्या. त्यानंतर नेशनने मॅकलिनच्या साथीने काही काळ डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. नेशन सर्वाधिक 32 धावा करून बाद झाली. तिने 3 चौकार नोंदवले, तर मॅकलिनने 17 धावांवर बाद झाली. विंडीजच्या अन्य फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. त्यामुळे विंडीजलाचा डाव 103 धावांतच गडगडला. दीप्ती शर्माने 10 धावांत 4 विकेट घेत हिंदुस्थानी विजयात सिंहाचा वाटा उचलला.

104 धावांच्या मर्यादित आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानी महिला संघाने एकही गडी गमावला नाही. हिंदुस्थानच्या शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामीच्या जोडीनेच हिंदुस्थानला विजय मिळवून दिला. शेफालीने 35 चेंडूंत 10 चौकार आणि 2 षटकार लगावत नाबाद 69 धावा फटकावल्या. स्मृती मंधानानेही तिला उत्तम साथ देत 28 चेंडूंत 4 चौकारांसह नाबाद 30 धावा केल्या. या दोघींनी केवळ 10.3 षटकांतच हिंदुस्थानला 10 विकेट राखून विजय मिळवून दिला. दीप्ती शर्माला गोलंदाजीतील दमदार कामगिरीमुळे ‘वुमन ऑफ द मॅच’ घोषित करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या