इंडिगो 1,000 हून अधिक पायलटची भरती करणार, ट्रेनीपासून कॅप्टनपर्यंतच्या पदांवर भरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडिगो एअरलाईन्स मोठय़ा प्रमाणावर पायलटची भरती करणार आहे. तब्बल एक हजारांहून अधिक पायलटची नियुक्ती केली जाणार आहे. देशातील विमान वाहतूक क्षेत्रातील कोणत्याही एअरलाइनने केलेल्या सर्वात मोठ्या भरती मोहिमांकैकी ही एक आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इंडिगोच्या सर्विसमध्ये मोठा गोंधळ झाला होता. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अवघ्या 7 दिवसांत 5,000 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली होती. या पार्श्वभूमीवर इंडिगो मोठय़ा संख्येने पायलट भरती करण्याच्या तयारीत आहे.

इंडिगोच्या या भरती प्रक्रियेत ट्रेनी फर्स्ट

ऑफिसर, सिनियर फर्स्ट ऑफिसर आणि कॅप्टन या पदांचा समावेश आहे. कंपनी आपला विस्तार आणि नियामक गरजा पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचलत आहे. इंडिगो दरमहा आपल्या ताफ्यात 4 नवीन विमाने समाविष्ट करेल. ती उडवण्यासाठी नवीन पायलटची गरज आहे.

पायलटवर कामाचा ताण

डिसेंबरमध्ये वैमानिकांच्या विश्रांतीचे नवीन नियम लागू झाले होते. यानुसार, रात्री 12 ते सकाळी 6 वाजेदरम्यान लँडिंगची संख्या मर्यादित करण्यात आली होती आणि साप्ताहिक विश्रांतीचा वेळ वाढवण्यात आला होता. डीजीसीएच्या तपासणीत असे समोर आले की, इंडिगोने नवीन नियमांनुसार पुरेशा भरती केल्या नव्हत्या आणि प्रशिक्षणाचा वेगही वाढवला नव्हता. यामुळे वैमानिकांवरील कामाचा ताण वाढला आणि मोठय़ा संख्येने उड्डाणे रद्द झाली.