इंडिगोला पुन्हा बॉम्बची धमकी

indigo

चेन्नईहून मुंबईला जाणाऱया इंडिगो फ्लाईट 6ई-5314 या फ्लाईटमध्ये बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर विमानाचे मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानात एकूण 172 प्रवासी होते. आज सकाळी 6.50 च्या सुमारास फ्लाईट चेन्नईहून निघाले होते. मुंबईला जात असताना त्यात एक बेवारस रिमोट सापडला. यानंतर वैमानिकांनी मुंबई एअर ट्रफिक कंट्रोलला माहिती दिली आणि इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. बॉम्बच्या भीतीने फ्लाईटला एका वेगळय़ा आयसोलेशन-बेमध्ये नेण्यात आले, जिथे सर्व प्रवासी विमानातून सुखरूप उतरले. या आधी विमानातील टिश्शू पेपरवर बॉम्बची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर प्रवाशांनी विमानातून उडय़ा मारल्या होत्या.

आठवडय़ातील दुसरी घटना

अवघ्या आठ दिवसांत इंडिगो एअरलाईन्सला बॉम्बची दुसरी धमकी मिळाली. 28 मे रोजी दिल्लीहून वाराणसीला जाणाऱया इंडिगोच्या 6ई-2211 या फ्लाईटला बॉम्बची धमकी मिळाली होती. त्या वेळी विमानात दोन मुलांसह 176 लोक होते. फ्लाईटमधील सर्व प्रवाशांना आपत्कालीन गेटमधून बाहेर काढण्यात आले होते.