
सुरतहून दुबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उड्डाणानंतर अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे या विमानाचे अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सकाळी साडेनऊ वाजता 6ई-1507 या विमानाने सुरत विमानतळावरून उड्डाण केले. समुद्रावर असताना विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे तत्काळ विमान सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर उतरवण्यात आले. वैमानिकाने प्रसंगावधान राखल्यामुळे अहमदाबाद अपघातासारखी भीषण घटना घडली नाही.
विमानात एकूण 150 प्रवासी होते. वैमानिकाला इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी विमान समुद्रावर होते. वैमानिकाने तत्काळ हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर विमान यशस्वीपणे विमानतळावर लँड करण्यात आले. विमान उतरवल्यानंतर प्रवाशांना पुढील व्यवस्था उपलब्ध करून देईपर्यंत दोन तास वाट पाहावी लागली. त्यानंतर दुसऱ्या विमानाने त्यांना दुबईला रवाना करण्यात आले.
महिनाभरात पाच मोठय़ा घटना
16 ऑगस्ट रोजी स्टार एयर हे विमान बेळगाव येथून मुंबईला निघाले होते. तेव्हा तांत्रिक बिघाड झाल्याने विमान पुन्हा बेळगावला वळवण्यात आले. z 17 ऑगस्ट रोजी 2025 इंडिगो हे विमान दिब्रूगढ येथून गुवाहाटीला निघाले होते. त्यावेळी तांत्रिक बिघाड झाला. पहिल्या वेळी विमान लँड करण्यात अपयश आले, मात्र दुसऱ्या प्रयत्नात विमान सुरक्षित लँड करण्यात आले.
20 ऑगस्ट रोजी अलायंस एअरच्या गुवाहाटी-कोलकाता विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान पुन्हा गुवाहाटीला आणण्यात आले. z 22 ऑगस्ट रोजी एअर इंडियाचे जोधपूरला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण तांत्रिक बिघाड झाल्याने थांबवण्यात आले. z 28 ऑगस्ट रोजी सुरतहून दुबईला निघालेले विमान तांत्रिक बिघाडामुळे अहमदाबाद विमानतळावर उतरवावे लागले.