
कुवेतहून हैदराबादकडे जाणाऱ्या इंडिगोच्या 6ई-1234 या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने मंगळवारी सकाळी मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. ही धमकी हैदराबाद विमानतळाला ई-मेलद्वारे मिळाली होती. ई-मेलमध्ये विमानामध्ये बॉम्ब असल्याची माहिती देण्यात आली. या धमकीनंतर विमान प्रशासनाने तत्काळ सर्व सुरक्षा यंत्रणांना अलर्ट केले. त्यानंतर विमानाला इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. एअरबस ए321-251 एनएक्स हे विमान रात्री 1 वाजून 56 मिनिटांनी कुवेतहून निघाले होते. ते सकाळी 8 वाजून 10 मिनिटाला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले. विमानाची तपासणी केल्यानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.























































