
मदुराईहून चेन्नईला चाललेल्या इंडिगो विमानाच्या विंडशील्डला तडा गेल्याने एकच गोंधळ उडाला. पायलटच्या सतर्कतेमुळे चेन्नई विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. विमानात 76 प्रवासी होते, सर्वांना सुरक्षित विमानातून उतरवण्यात आले. शनिवारी सकाळी ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, लँडिंगच्या अगदी आधी पायलटला कॉकपिटच्या काचेत तडा दिसला. त्याने तात्काळ विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रकाला माहिती दिली. पायलटच्या सतर्कतेनंतर, सुरक्षित लँडिंगची तयारी करण्यात आली. विमान धावपट्टीवर सुरक्षित उतरल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. विमानतळावर उतरल्यानंतर, विमानाची विंडशील्ड बदलण्याची व्यवस्था करण्यात आली. तथापि, तडा जाण्याचे कारण अद्याप कळलेले नाही. घटनेनंतर मदुराईला परतण्याची विमानसेवा रद्द करण्यात आली.