
शेकडो लोकांचे प्राण धोक्यात घातल्या प्रकरणी हिंदुस्थानी विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि इंडिगो एअरलाइन्सवर ‘डीजीसीए’ने कारवाई करत चौकशीचे आदेश दिले आहेत. कोलकाता आणि भुवनेश्वरला जाणारी इंडिगोची दोन विमाने जमिनीपासून 3,000 फूट उंचीवर एकमेकांवर आदळल्यापासून थोडक्यात बचावली आहेत. यावेळी दोन्ही विमानांमध्ये 400 हून अधिक प्रवासी उपस्थित होते. इंडिगोची उड्डाणे 6E-455 आणि 6E 246 कोलकाता आणि भुवनेश्वरसाठी एकाच धावपट्टीवरून उड्डाण करणार होती. यावेळी बेंगळुरू विमानतळावरील हवाई क्षेत्राचे बारकाईने निरीक्षण करणाऱ्या एका रडार नियंत्रकाच्या तत्परतेमुळे हा मोठा अपघात टळला आहे.
लोकेंद्र सिंग असे या रडार नियंत्रकाचे नाव आहे. त्यांच्या तत्परतेचे कौतुक सर्वत्र होत असून त्यांच्यामुळेच ही मोठी दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही विमानांमध्ये बसवण्यात आलेली ट्रॅफिक कोलिजन अव्हायडन्स सिस्टीम (TCAS) लॅटरल सेपरेशनमुळे बंद झाली नाही. त्यावेळी दोन्ही पायलटना वेगवेगळ्या नियंत्रकांकडून दिशानिर्देश मिळत असल्याने त्यांना संभावित धोक्याची कल्पना नव्हती. त्याचवेळी इंडिगोची हे दोन विमाने समोरासमोर असल्याचे हवाई वाहतूक नियंत्रकाला समजताच त्यांनी दोन्ही वैमानिकांना दिशा बदलण्याचे आदेश दिले. एका पायलटने विमान उजवीकडे आणि दुसऱ्याने डावीकडे वळवले, ज्यामुळे मोठा अपघात टळला.
दरम्यान, या घटनेची नोंद कोणत्याही लॉगबुकमध्ये करण्यात आलेली नाही. तसेच हिंदुस्थानी विमानतळ प्राधिकरणानेही (AAI) याची नोंद केली नाही. दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) प्रमुख अरुण कुमार म्हणाले की, विमान वाहतूक नियामक या घटनेची चौकशी करत असून दोषींवर लवकरच कारवाई करण्यात येईल.



























































