इंदुरीकर महाराजांकडून दिलगिरी

634

‘गेल्या 26 वर्षांपासून मी कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम करीत आहे. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो’, असे ह.भ.प. इंदुरीकर महाराज देशमुख यांनी आज प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, कालच त्यांनी भाविकांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते.

‘सम तिथीला स्त्र्ााrसंग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते’, असे वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनात केले होते. त्यावरून वाद निर्माण झाला असून, त्यांच्यावर टीका होत होती. इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली होती. दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी आता या वादावर पडदा टाकला आहे.

पत्रकामध्ये इंदुरीकर महाराज म्हणतात, ‘आठ दिवसांपासून माझ्या कीर्तनसेवेची ‘त्या’ वक्तव्यामुळे सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियासह इतर समाजमाध्यमांत माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. मी वारकरी संप्रदायाचा पाईक असून, माझ्या 26 वर्षांच्या कीर्तनरुपी सेवेत मी समाजप्रबोधन, समाज संघटन, अंधश्रद्धा निर्मूलन, विविध जाचक रूढी-परंपरा यावर भर दिला होता. माझ्या कीर्तनरुपी सेवेतील त्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो’, असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे.

तृप्ती देसाईंकडून तक्रार दाखल

इंदुरीकर महाराजांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी नगरमध्ये आलेल्या तृप्ती देसाई यांना सुपा येथे इंदुरीकर महाराजांच्या समर्थकांनी काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध व्यक्त केला. मोठय़ा पोलीस बंदोबस्तात तृप्ती देसाई यांना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आणण्यात आले. यावेळी प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांना तृप्ती देसाई यांनी निवेदन देत इंदुरीकर महाराज यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास मुंबईत तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, तृप्ती देसाई यांना इशारा देणाऱया स्मिता अष्टेकर यांना सुपा येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या