शैलगृहांच्या विश्वात – भाजे येथील अद्वितीय शिल्पसंपदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. मंजिरी भालेराव

भाजे लेणी समूहातील जास्त चर्चिला गेलेला विहार म्हणजे `इंद्र -सूर्य’ शिल्प असलेला विहार. या विहारात अनेक कथनशिल्पे कोरलेली आढळतात. अभ्यासकांनी या शिल्पांचा विविध प्रकारे अर्थ लावायचा प्रयत्न केला आहे. ही शिल्पसंपदा व स्थापत्यातील इतर महत्त्वपूर्ण वैशिष्टय़ांमुळे या विहाराचे भाजे लेणीसमूहात काही विशेष स्थान असावे असा संशोधकांचा कयास आहे.

भाजे येथील प्राचीन बौद्ध लेणी समूहातील चैत्यगृहाशी संबंधित काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण आतापर्यंत पाहिल्या. या शैलगृहसमूहात बौद्ध भिक्षूंच्या वर्षाकालीन निवासासाठी काही विहार आणि त्या ठिकाणी मरण पावलेल्या काही विद्वान भिक्षूंचे स्मारक स्तूप तसेच त्यावरील लेख, याही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात निर्माण झालेले भाजे येथील चैत्यगृह या समूहाच्या मधोमध आहे. त्याच्या दोन्ही बाजूला मोठय़ा संख्येने विहार कोरलेले आहेत. विविध प्रकारच्या आकाराचे आणि रचनेचे विहार इथे काळाच्या ओघात निर्माण झाले. त्यापैकी काहींवर त्यांच्या निर्मितीसाठी ज्यांनी दान दिले होते त्यांची नावे सांगणारे लेखही आहेत.

महाराष्ट्रातील अनेक लेणीसमूहात स्मशानगुंफा नावाने ओळखल्या जाणाऱ्या जागा आहेत. भाजे येथील 14 स्तूपांचा समूह यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. इथे चैत्यगृहाकडे तोंड केले असता उजवीकडे जे कोरीव काम झाले आहे तिथे थोडय़ा अंतरावर हा स्तूपांचा समूह दिसतो. हे सगळे स्तूप एकाच काळात कोरले गेले नव्हते हे त्यांच्या हर्मिका आणि छत्र यांच्या रचनेवरून सांगता येते. त्यापैकी अनेक स्तूपांवर कोरीव लेख होते हे सहज लक्षात येते.

भाजे येथील विहारांमध्ये सगळ्यात जास्त चर्चिला गेलेला विहार म्हणजे या स्तूपांकडून पुढे गेल्यावर धबधब्याच्या अलीकडे असलेला तथाकथित `इंद्र -सूर्य’ शिल्प असलेला विहार. भारतातील बौद्ध कलेमध्ये भारहूत, सांची, अमरावती अशा बांधीव स्तूप असलेल्या स्थळांची शिल्पे जगप्रसिद्ध आहेत. ज्या संख्येने ही कथनशिल्पे बांधीव स्तूपाच्या वेदिकेवर, तोरणावर आढळतात त्याच्यापेक्षा खूपच कमी ही महाराष्ट्रातील शैलगृहांमध्ये आहेत. या विधानाला फार थोडे अपवाद आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा अपवाद म्हणजे भाजे. वर उल्लेखिलेल्या विहारात अनेक शिल्पे कोरलेली आहेत. त्यांचा नेमका अर्थ काय असावा याबद्दल अनेक अभ्यासकांनी संशोधनपर लेखन करून त्यांची मते मांडायचा प्रयत्न केला आहे. पण त्याआधी या विहाराच्या शोधाची कथा थोडक्यात पाहूया.

1879 मध्ये जेव्हा या विहाराचा शोध लागला तेव्हा शेजारच्या मोठय़ा धबधब्यामुळे त्यात सगळा चिखल, माती भरलेली होती. या काळात बर्जेस आणि फर्ग्युसन त्यांच्या `केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया’ या ग्रंथाचे लेखन करत होते. तेव्हा नव्याने सापडला म्हणून याला त्यांनी `न्यू विहार’ असे नाव दिले. तिथल्या सर्व शिल्पांची रेखाचित्रे तयार केली. या विहाराच्या वरांडय़ात एक खोली आहे. तिच्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला भिंत भरून शिल्पकाम केलेले आहे. एका बाजूला चार घोडय़ांच्या रथात एक व्यक्ती आणि त्याच्या बाजूला हातात चौरी असलेल्या दोन स्त्रिया दाखवल्या आहेत. रथाच्या खाली काही राक्षसी वाटाव्या अशा आकृत्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती हत्तीवर बसून जणू काही चाल करून येतो आहे असे वाटते. त्या हत्तीने सोंडेने एक मोठा वृक्ष उपटलेला दाखवलेला आहे. त्या हत्तीच्या एका पायाखाली बोधिवृक्षासारखा दिसणारा एक वृक्ष दिसतो आहे. त्याच्या खाली एक व्यक्ती आसनावर बसली आहे तर एक व्यक्ती तबल्यासारखे वाद्य वाजवते आहे. शेजारी एक अश्वमुखी स्त्राr एका माणसाचा हात धरून त्याला घेऊन जाते आहे असेही दाखवले आहे. या दोन्ही कथनशिल्पांमध्ये खूप पात्रे दाखवली आहेत. अनेक भारतीय आणि परदेशी अभ्यासकांनी या शिल्पांचा विविध प्रकारे अर्थ लावायचा प्रयत्न केला आहे. कोणी सूर्य आणि इंद्र म्हणाले, कोणी सम्राट मांधाता, तर कोणी राजा खारवेल आणि श्री सातकर्णी यांचे युद्ध आहे असे सांगितले. यामध्ये एकच गोष्ट आहे की अनेक गोष्टींचे एकत्रीकरण आहे हेसुद्धा सांगणे अवघड आहे. हत्तीच्या शिल्पात दाखवलेली अश्वमुखी स्त्राr `पादकुसलमानव जातक’ या कथेत दिसते. पण त्यातील बाकीची पत्रे इथे दिसत नाहीत. त्यामुळे खरे म्हणजे अजूनपर्यंत या शिल्पांचा नेमका सगळ्यांना पटेल असा अर्थ लागला नाही हेच म्हणणे योग्य ठरेल.

या भिंतीच्या समोरच्या बाजूला एक कट्टा आहे आणि त्याच्या जवळ असलेल्या अर्धस्तंभांवर स्त्राr आणि पुरुष सेंटोर (बैल किंवा घोडा यांचे शरीर आणि माणसाचे कमरेपासून वर असलेले धड) यांच्या जोडय़ा आहेत. तसेच त्या कट्टय़ाच्या समोरच्या बाजूला पीठावर अनेक प्राण्यांची शिल्पे आहेत. त्यामध्ये काही घोडेस्वार, काही भारवाहक  तर बैलासारखे प्राणी आणि एक पंख असलेला घोडा आहे. ग्रीक पुराकथांमध्ये सेंटोर तसेच पंख असलेला घोडा म्हणजे पेगासिस यांचे उल्लेख आढळतात. पण त्यांचे इथे असलेले अस्तित्व अनेक प्रश्न उपस्थित करतात. तसेच दरवाज्यांच्या दोन्ही बाजूला द्वारपालासारखी तीन शिल्पे कोरली आहेत. विहाराच्या आतल्या बाजूस दोन भिंतींमध्ये खोल्या कोरल्या आहेत, तर एका भिंतीलगत एक मोठा कट्टा आहे. त्या भिंतीत तीन कोनाडे आणि त्याच्यावर चैत्य कमानी आहेत. प्रत्येक कोनाडय़ानंतर एक रक्षक आहे. पण यांचे प्रयोजन आज स्पष्ट होत नाही. काहीतरी पवित्र पूजनीय वस्तू (एखादा ग्रंथ, छोटा स्तूप किंवा मूर्ती) तिथे ठेवायची योजना असावी. या लेण्याच्या वरांडय़ाचे छतसुद्धा गजपृष्ठाकृती आहे तर भिंतीवर स्तूप आणि भारवाहक व्यक्ती अशी एकाआड एक अशी सुशोभनाची योजना आहे. या सर्व वैशिष्टय़ांमुळे या विहाराचे भाजे लेणीसमूहात काही विशेष स्थान असावे असा संशोधकांचा कयास आहे. पण अजूनपर्यंतच्या अभ्यासात या सर्व प्रश्नांची समाधानकारक स्पष्टीकरणे कोणीही देऊ शकले नाही.

भाजे येथील लेणीसमूह हा जसा आज अनेक कारणांनी महत्त्वाचा वाटतो तसाच तो प्राचीन काळी इतर अनेक कारणांमुळे महत्त्वाचा असणार यात शंका नाही. बौद्ध भिक्षूंच्या आचारामध्ये `उपोसथ’ या कार्पामाचे खूप महत्त्व होते. त्या वेळेस आसपासच्या परिसरातील भिक्षूजवळच्या त्यांच्या पंथाच्या मोठय़ा संघाबरोबर उपोसथ करत असत. कदाचित प्राचीन काळी भाजे हे त्या परिसरातील सर्वात मोठय़ा संघाचे स्थान असावे. इ.स. पूर्व 2 रे शतक ते इ.स.चे 6 वे – 7 वे शतक असा जरी याचा कालखंड असला तरी इथे बुद्धाची एकही मूर्ती पाहायला मिळत नाही. चैत्यगृहातील स्तंभांवर मात्र बुद्धाची मानवी रूपातील चित्रे होती असे अवशेष आहेत. येथील चैत्यगृहात साधारण 200 माणसे बसू शकतील एवढी जागा आहे. तसेच एवढय़ा मोठय़ा संख्येने असलेले स्मारक स्तूपसुद्धा या स्थळाचे महत्त्व अधोरेखित करतात. परंतु याबद्दलचे काहीही लिखित पुरावे किंवा आवश्यक ते अभिलेखीय पुरावे नसल्यामुळे आपल्याला या स्थळाचे प्राचीन काळातील नेमके महत्त्व आज पूर्णपणे समजत नाही.

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत व भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख आहेत.)

[email protected]