इंदू मिलमधील स्मारकासाठी बाबासाहेबांच्या पुतळय़ाचे दोन नमुने तयार

413

शिवाजी पार्क येथील इंदू मिलमध्ये महामानव ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारले जात आहे. त्या स्मारकात बाबासाहेबांचा भव्य पुतळाही उभारला जाणार आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याचे दोन नमुने तयार केले आहेत. तीन तज्ञांच्या समितीने त्या पुतळ्यांमध्ये काही बदल सुचवले असून त्यानुसार शिल्पकारांनी त्यात बदल केल्यावर त्यातील एका पुतळ्याची स्मारकासाठी निवड केली जाईल.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) गेल्या वर्षीपासूनच इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात केली. आतापर्यंत 20 टक्के काम पूर्ण झाले आहे. शिल्पकार राम सुतार यांनी 10 फूट आणि 25 फूट उंचीचे दोन पुतळे तयार केले आहेत. त्यातील एका पुतळ्याची तज्ञ समितीकडून निवड झाल्यानंतर त्यानुसार बाबासाहेबांचा सुमारे साडेतीनशे फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा तयार केला जाणार आहे अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱयांनी दिली.

डॉ. आंबेडकर स्मारकात बेसमेंटमध्ये दुमजली पार्किंग उभारले जात आहे. त्यात एकाच वेळी 450 वाहने पार्क करण्याची सुविधा असेल. पर्यटकांच्या फक्त 6-7 बसेसनाच पार्किंगसाठी परवानगी दिली जाणार आहे. या पार्किंगसाठी खोदकाम सुरू असून 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. या स्मारकासाठी एमएमआरडीएकडून 709 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या