
सामना ऑनलाईन, मुंबई
जंतुसंसर्ग, न्युमोनिया अशा विविध कारणांमुळे महाराष्ट्रात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या(एचएमआएस) अहवालात नमूद केले आहे. राज्यात 2018-19मध्ये 16 हजार 539 अर्भकांचा मृत्यू झाल्याची माहिती आज विधानसभेत सादर करण्यात आली.
राज्यात नवजात अर्भकांच्या मृत्यूबाबत विजय वडेट्टीवार, मंगेश कुडाळकर आदींनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात माहिती दिली. एचएमआयएसच्या अहवालानुसार एप्रिल ते ऑगस्ट 2017 या कालावधीत सोलापूर जिह्यात 309 अर्भकांचा मृत्यू झाला. 2013 ते 2030पर्यंत शाश्वत विकास उदिष्टा अंतर्गत राज्यातील अर्भक मृत्यू दर खाली आणण्याचे उदिष्ट आहे. 2014मध्ये एक हजारांच्या मागे 22 अर्भक असा मृत्यू दर होता. आता अर्भक मृत्यूचा दर 10पर्यंत खाली आणण्याचे उदिष्ट आहे.
मृत्यूदर खाली आणण्याचे प्रयत्न
अर्भकांचा मृत्यू दर खाली आणण्यासाठी गरोदरपणातील संपूर्ण तपासणी व उपचार, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम, नियमित लसीकरण, नवजात काळजी कक्ष, बाल उपचार केंद्र, जीवनसत्व अ चा पुरवठा, तज्ञांमार्फत मातांची व बालकांची तपासणी व उपचार नवसंजीवनी कार्यक्रमा अंतर्गत मातृत्व अनुदान योजना, भरारी पथकामार्फत आरोग्य तपासणी अशा योजना आखण्यात आल्या आहेत, अशी माहितीही लेखी उत्तरात देण्यात आली.
अर्भक मृत्यूची आकडेवारी
- वर्ष- 2016-17- 10 हजार 348 अर्भकांचा मृत्यू
- वर्ष-2017-18- 13 हजार 069 अर्भकांचा मृत्यू
- वर्ष- 2018-19 16 हजार 539 अर्भकांचा मृत्यू
- (आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अहवालानुसार)




























































