प्रीमियम पेट्रोल आणि सिमेंट महागले; ५ राज्यांतील निवडणुकांनंतर महागाईचा बॉम्ब फुटणार, आपचा केंद्रावर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच, आता सिमेंट आणि प्रीमियम पेट्रोलच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे (AAP) प्रवक्ते अनुराग ढांडा यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपताच देशात महागाईचा मोठा स्फोट होणार असून जनता सध्या गॅस आणि इंधनासाठी रांगेत उभी असल्याचे ते म्हणाले.

अनुराग ढांडा यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन महिन्यांत व्यावसायिक (Commercial) गॅस सिलेंडरच्या दरात पाच वेळा वाढ करण्यात आली आहे. एकूणच कमर्शियल सिलेंडर आता ५२५ रुपयांनी महागला आहे. तसेच गेल्या एका महिन्यात प्रीमियम पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर १५ रुपयांची वाढ झाली आहे. “व्यावसायिक असो वा घरगुती, गॅस तर एकच असतो, मग ही दरवाढ कशासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

केवळ इंधनच नाही, तर बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या सिमेंटच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. सिमेंटच्या एका बॅगमागे ५० ते १०० रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न महाग झाले आहे. याशिवाय विमान इंधनाच्या (Jet Fuel) किमतीतही आज वाढ करण्यात आली असून घरगुती क्षेत्रात ही वाढ ८.५ टक्के इतकी नोंदवण्यात आली आहे.

अनुराग ढांडा यांनी भाजप सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, “संपूर्ण देश सध्या महागाईच्या दहशतीखाली आहे. हरयाणासारख्या राज्यांमध्ये घरगुती सिलेंडरसाठी लोकांना ७ ते ९ तास रांगेत उभे राहावे लागत आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्ष निवडणूक रॅलींमध्ये व्यस्त आहे.” हरयाणात सिलेंडरचा काळाबाजार सुरू असून लोक ३००० रुपयांपर्यंत किंमत मोजत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.