टी-20 वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का, पॅट कमिन्सच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या आधीच ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. संघाचा कर्णधार आणि आघाडीचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याच्या फिटनेसबाबत मोठी शंका निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक ऍण्ड्रय़ू मॅकडोनाल्ड यांनी स्पष्ट संकेत दिले असून कमिन्सचा पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमधील सहभाग सध्या ‘अत्यंत अनिश्चित’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पाठीच्या दुखापतीशी झुंज

पॅट कमिन्सने ‘ऍशेस 2025’ मालिकेतील तिसऱ्या कसोटीत पुनरागमन केले होते. ऍडलेड कसोटीत सहा विकेट घेत ऑस्ट्रेलियाला मालिकेत 3-0 अशी अजेय आघाडी मिळवून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला, मात्र त्यानंतर तो उर्वरित कसोटी सामन्यांत खेळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. कमिन्स सध्या पाठीच्या दुखापतीला सामोरे जात असून त्यामुळे त्याचा वर्कलोड मर्यादित ठेवण्यात येत आहे.