मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात कैद्याने केला अधिकाऱ्यावर हल्ला

आर्थर रोड तुरुंगात कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तुरुंग अधिकाऱ्याला कैद्याने मारहाण केली. या मारहाणीत तुरुंग अधिकारी राकेश चव्हाण हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घडल्या प्रकरणी एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी अफान खानविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

आर्थर रोड तुरुंगात विविध गुह्यांतील आरोपींना ठेवले जाते. एका गुह्यात पोलिसांनी अफानला अटक केली होती. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याला आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले आहे. शनिवारी दुपारी अफानचा एका कैद्यांसोबत वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हा प्रकार तुरुंग अधिकारी राकेश चव्हाण यांच्या निदर्शनास आला. त्यांनी बॅरेकमध्ये जाऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांना त्यांनी बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने अफानने चव्हाण यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर त्याने चव्हाण यांच्यावर हल्ला केला. तसेच मारहाण करून मेन गेटवर त्याचे डोके जोरात आदळले. त्यात चव्हाण हे जखमी झाले. अचानक आरडाओरड झाल्यावर तेथे तुरुंगातील अधिकारी धावत आले. जखमी झालेल्या चव्हाण याना उपचासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती समजताच एन.एम. जोशी मार्ग पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी चव्हाण याचा जबाब नोंदवून घेतला. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अफानविरोधात गुन्हा नोंद केला. अफानला दुसऱया बॅरेकमध्ये हलवण्यात आले आहे.