
सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
बीड जिल्ह्यातील वांगी येथे मिड डे मिल मध्ये मटकी खाल्याने 93 मुलांना झालेली विषबाधेची घटना अतिशय गंभीर असून या संपूर्ण शालेय पोषण आहाराच्या योजनेचीच उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
गुरूवारी दुपारी झालेल्या या घटनेने खळबळ उडाली असून शालेय पोषण आहारातील आहारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या बाबत धनंजय मुंडे म्हणाले की, सदर घटना अतिशय गंभीर असून या बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्रशासनाने प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. त्यांना चांगले उपचार करून त्यांना यातून लवकरात लवकर बाहेर काढून पालकांना दिलासा दिला पाहिजे.
शालेय पोषण आहार योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतांना मुंडे म्हणाले की, बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची ही योजना असतांना त्यात प्रचंड मोठा घोटाळा असल्यानेच अशा घटना वारंवार घडत आहेत. निकृष्ट दर्जाचा आणि कमी पुरवठा यातून ही योजना म्हणजे संपूर्ण भ्रष्टाचाराने पोखरली असून त्याची संपूर्ण उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे, याबाबत आपण आगामी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे.
पंकजा मुंडे यांनी विषबाधित मुलांची केली चौकशी
वांगी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी आज संध्याकाळी बीडच्या जिल्हा रूग्णालयात जावून विषबाधेमुळे उपचार घेत असलेल्या मुलांच्या तब्येतीची विचारपूस केली. दरम्यान, मुलांच्या आहाराच्या बाबतीत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल. तसेच मुलांना दिलेल्या आहाराचे नमुने अन्न व औषध प्रशासनाला पाठविण्यात आले आहेत, त्याचा अहवाल आल्यानंतर यात जे दोषी आढळतील त्यांचेवर तसेच दोषी आढळल्यास कंत्राटदारांवरही कठोर कारवाई केली जाईल. असे सांगितले.





























































