
वाढत्या प्रदूषणामुळे मधमाश्यांसारख्या मित्र कीटकांची संख्या कमी होत चालली आहे हे मनुष्यसृष्टीसाठी धोकादायक आहे. मधमाश्या संपल्या तर अवघ्या चार वर्षांत मनुष्यसृष्टी संपेल, असे प्रतिपादन मधुमक्षिका तज्ञ टी. बी. निकम यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ आणि ग्रेप काऊंटी बायोडायव्हर्सिटी पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील ग्रेप काऊंटी पार्क येथे देशातील पहिला कीटक आणि जैवविविधता महोत्सव रविवारी पार पडला यावेळी निकम बोलत होते. त्यांनी मधमाश्यांवर आधारीत चित्रफीत दाखविली. वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरणाला हानीकारक अशा शत्रू किटकांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे, तर मित्र किटकांची संख्या कमी होत आहे. मधमाश्यांसारखे मित्र कीटक कमी होणे धोक्याचे आहे, यामुळे आता ‘मधुक्रांती’ची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कीटक हे पराग वहनाचे महत्त्वाचे काम करीत असून, त्यांच्या मदतीनेच अन्नसाखळी पूर्ण होते, असे पक्षीतज्ञ डॉ. श्रीश क्षीरसागर म्हणाले. कीटक संवर्धनाची सुरुवात घरापासून करायला हवी. किटकांना मारू नये. मुंग्या आणि कीटकांमुळे झाडांना मदत होते, हे लक्षात घ्यायला हवे, असे कीटक तज्ञ अभिजीत महाले यांनी स्पष्ट केले. मुलांना पर्यावरणाची माहिती व्हावी, या उद्देशाने आता दरवर्षी हा महोत्सव भरविला जाणार असल्याची माहिती रोटरी अध्यक्ष मनीष ओबेरॉय यांनी दिली.
महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी रोटरी अध्यक्ष मनीष ओबेरॉय, ग्रेप काउंटीचे संचालक किरण चव्हाण, तेजस चव्हाण यांच्यासह अक्षय धोंगडे, राजेश पंचाक्षरी, प्रशांत सारडा, सुरेश सूर्यवंशी, अनिल साखरे, राजेंद्र धारणकर यांनी परिश्रम घेतले.
नाशिककरांसाठी पर्वणी
नाशिक शहरासह जिल्हाभरातून साडेतीनशेहून अधिक नागरिकांनी या महोत्सवात हजेरी लावली. यात लहान मुले, तसेच शेतकऱयांची संख्या मोठी होती. दुर्मिळ होत चाललेले कीटक, पक्षी, फुलपाखरे यांचे अनोखे विश्व या महोत्सवाच्या माध्यमातून सर्वांना अनुभवता आले. दरवर्षी हा महोत्सव होणार असल्याने नाशिककरांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
या जैवसंपदेची मिळाली माहिती
या महोत्सवातून उपस्थितांना विविध प्रकारच्या कीटक, फुलपाखरे, पक्षी, अळ्या यांची माहिती मिळाली. इटालियन, फुलोरी, आगी, ट्रोकीना व सॉलिटर बी या मधमाश्यांचे प्रकार दाखविण्यात आले. कॉमम क्रो, प्लेन टाईगर, कॉमन टाईगर, हेज ब्लू, ड्रगन फ्लाय, ग्रास यलो या जातींची फुलपाखरे बघायला मिळाली. ब्लॅक ड्रँगो, पेड बुशचॅट, जंगल मैना, ब्राह्मणी मैना, क्रेस्टेड लार्क, रुफस टेल लार्क, मॅग्पी रॉबिन, इंडियन रॉबिन, पर्पल सनबर्ड, रेड वॅटलेड लॅपिंग, लाफिंग डोव, एग्रीट्स, हेरॉन्स, किंगफिशर हे पक्षी, तर ग्रासहूपर, कॅटेडीडस, बीटल्स, ड्रगनफ्लाईज, डॅमस्लिज, बग्स या किटकांची माहिती देण्यात आली.































































