इंडक्शन कुकरच्या आत होते एम्फेटामाईन; 500 ग्रॅम एम्फेटामाईन केले जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडक्शन कुकरच्या आत एम्फेटामाईन ड्रग्ज लपवून ड्रग्ज तस्करीचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने पर्दाफाश केला. अंधेरीच्या एका कुरीअर कंपनीत ‘एनसीबी’ने तपासणी करून कुकरच्या आत लपवलेले एम्फेटामाईन ड्रग्ज जप्त केले. ते ड्रग्ज मुंबईतून कुरीअरच्या माध्यमातून न्यूझीलंडला जात होते. ड्रग्जचे पार्सल पाठवणाऱयाचा ‘एनसीबी’ शोध घेत आहेत.

अंधेरीच्या एका कुरीअर कंपनीमधून न्यूझीलंडला एक पार्सल जाणार आहे. त्या पार्सलच्या माध्यमातून ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती ‘एनसीबी’ला मिळाली. त्या माहितीनंतर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकातील अधिकाऱयांनी त्या कुरीअर कंपनीत जाऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान एनसीबीने ते पार्सल उघडले असता त्यात एक इंडक्शन कुकर दिला. त्या कुकरचे वजन जास्त वाटू लागल्याने ‘एनसीबी’च्या अधिकाऱयांना संशय आला. ‘एनसीबी’च्या अधिकाऱयांनी त्या कुकरची तपासणी केली असता त्या कुकरच्या आतून सुमारे 500 ग्रॅम एम्फेटामाईन ड्रग्ज जप्त केले.

एम्फेटामाईन तस्करीप्रकरणी ‘एनसीबी’ने गुन्हा दाखल केला आहे. ते पार्सल कोण न्यूझीलंडला पाठवत होते त्याची माहिती ‘एनसीबी’चे अधिकारी काढत आहेत. पूर्वी परदेशातील तस्कर हे हिंदुस्थान ड्रग्ज आणि सोने तस्करीसाठी गृहोपयोगी वस्तूचा वापर करत होते. मात्र आता हिंदुस्थानातून परदेशात ड्रग्ज पाठवण्यासाठी हा गृहोपयोगी वस्तू पाठवण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. गेल्याच महिन्यात ‘एनसीबी’ने अंधेरीच्या एका कुरीअर कंपनीत तपासणी करून जेवणाच्या डब्यातून एफ्रेडीन तस्करी करण्याचा प्रयत्न केला होता. ‘एनसीबी’ने दोन किलो एफ्रेडीन जप्त केले होते.