
>> डॉ. अनिल कुलकर्णी
मनोविकास प्रकाशन संस्थेने तामीळ लेखिका सलमा यांचे व सोनाली नवांगुळ यांनी अनुवाद केलेले पुस्तक ज्याला साहित्य अकादमीचा नुकताच पुरस्कार मिळाला. या कादंबरीला उत्कृष्ट अनुवादासाठी साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरविले आहे.
तसे प्रत्येकाचे तास ज्याचे त्याचेच असतात. जिथे प्रेम आहे तिथे काही तासांवर दुसऱ्यांचीही हुकमत असते. मध्यरात्रीनंतरचे तास आपल्या हातात नसतात. त्यांच्यावर आठवणींची, विचारांची, शरीराची, प्रेमाची, वासनेची हुकमत असते. लैंगिक घुसमट होणाऱयांची मध्यरात्रीनंतर अवस्था बेचैन करणारी असते.
उंबरठय़ाच्या आत असलेल्या बायकांचे जीवन, बायकांच्या जगात त्रास देणारे पुरुष तसेच स्त्रियांचे अभावग्रस्त जगणे यात चितारले आहे. नमाजाच्या मधल्या वेळातच जगणे व जीवन-मृत्यूचे सोहळे तसेच घरासाठी राबणे यात लैंगिकतेचा विचारही न करता येणे अशा अनेक स्त्रियांची घुसमट यात आहे.
तामीळनाडूमधील बायकांनी तोंड उघडणेच मान्य नसणाऱया रुढीप्रिय आणि बंदिस्त समाजात 1968 मध्ये सलमाचा जन्म झाला. तिचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला तेव्हा हा परंपरावादी समाज हादरला. सलमा व आणखी तीन कवयित्रीवर अश्लील व बीभत्स लेखनाचा आरोप झाला. त्यांना धमक्या दिल्या गेल्या. तामीळनाडूमधील तिरुचिरापल्ली या जिह्याच्या तिरुवनकुरीची ग्रामपंचायतची सरपंच म्हणून सलमाने काम केलं. राज्याच्या समाजकल्याण मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची ही संधीही तिला मिळाली. राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवलेल्या लेखिकेची ही पहिलीच कादंबरी तिला आंतरराष्ट्रीय ख्याती देऊन गेली.
या कादंबरीतील रबिया, रहिमा जोहरा अमीना, खदिजा, फिरदौस, फरिदा, नुराम्मा आणि अशा आणखी कितीतरी स्त्रिया त्यांच्या खासगी पुरुषसत्ताक जगात छोटी-छोटी विद्रोहाची निशाणी फडकवतात. नाना तडजोडी करतात… मैत्री जुळते, भंगते, घरं एकत्र येतात, दुभंगतात, पण या सगळ्यांच्या नकळत धिमेपणाने बदल घडत राहतात… बायकांची आयुष्यं बदलून जातात.
सलमाची काव्यात्मक, सरळसाधी भाषा मुस्लिम स्त्रियांच्या कौटुंबिक जगण्यातील व्यस्तता, जटिलता आणि घुसमट परिणामकारकपणे मांडते. जगण्याच्या घुसमटीतून आपल्या पावलांपुरता प्रकाश आणि स्वातंत्र्य शोधणाऱया सर्वांना हे पुस्तक सोनालीने अर्पण केले आहे. कविता महाजन यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.
उंबरठय़ाबाहेरचे जग लेखिका सहसा रंगवत नाही. रबिया या वयात येऊ घातलेल्या लहान मुलीची ही गोष्ट मुलींनी, स्त्रियांनी सिनेमा बघायचा नाही हा फतवा निघाल्यावर एक दार बंद होऊन जातं. तरी घरातल्या टीव्हीवर पोर्न कॅसेट बघण्याचा व व्हिडीओवर गाणी ऐकण्याचा पर्याय बायकांकडे आहे. घरातले कमावते पुरुष अर्थार्जनासाठी त्यांचं दुसऱया देशात जाणं, परत येणं व काहीच परत न येणं, तिथेच मृत्यू पावणं, तिथून पत्र व भेटवस्तू पाठवणं, तिथं त्यांनी दुसऱया बायकोशी घरोबा करणं हे सारं त्या देशांमधल्या सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीवर अवलंबून राहतं. त्याचे चांगले वाईट परिणाम गावातल्या बायकांच्या उंबरठय़ाच्या या आतल्या जगावर होत राहतात. या परिणामाचे सविस्तर चित्रण ही कादंबरी प्रभावीपणे करते.
लहान वयात होणारे विवाह, पुनर्विवाह, एकटय़ा बायकांचे पुरुषाशिवाय जगणं, त्यांची लैंगिक भूक दर्शवणारी मोकळी चर्चा, विधवा आणि घटस्फोटित बायकांचा दबलेला हुंकार या कादंबरीत आपल्याला दिसतो. तरीही त्यात धाग्यांची गुंतागुंत अजिबात नाही. मोठय़ा धाग्यावर अनेक धाग्यांनी केलेलं हे सहज गाठी नसलेलं सरळ धाग्याचं विणकाम लेखिकेने केलं आहे.
मुस्लिम समाजाचं, त्यांच्या दैनंदिन जगण्यात वागण्याचे, रुढी-परंपरांचे सहज चित्रण या कादंबरीत आढळतं. हे सर्व वाचताना मनाला विषण्णता येत नाही. धर्माविषयीचे कुतूहल, वर्गभेदाचं कुतूहल, स्त्री-पुरुष भेदाचं कुतूहल, अशा अनेकविध कुतूहलाच्या पातळीवर हे लेखन वाचकाला गुंतवून ठेवतं.
स्त्रियांच्या व्यथा-वेदना यांचे उत्कट चित्रण लेखिकेनं चितारलं आहे. सोनाली यांनी भाषांतर करतानासुद्धा सलमाच्या काव्यातील शब्दांची धिटाई, स्पष्टवक्तेपणा हा जाणवतो. रूढी, परंपरेमुळे व लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे शिक्षणाचा व सुसंस्कृतपणाचा अभाव असल्यामुळे लैंगिकता विकृतीचा कधी हात धरते ते कळत नाही. ज्या कुटुंबात सुसंवाद नाही, शिस्तीच्या नावाखाली व्यक्तिमत्त्वाची गळचेपी होते, घुसमट होते, तिथे मध्यरात्रीनंतरचे तास बेचैन करणारेच असतात. या बाहेर पडणाऱया घुसमटीवर उपाय शोधल्यानेच मध्यरात्रीनंतरचे तास सुसह्य होणार आहेत.
मध्यरात्रीनंतरचे तास
लेखिका : सलमा
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
पृष्ठ : 560, मूल्य : रुपये 500/-
























































