उरणमध्ये अंतर्गत कलह विकोपाला गेला; शिंदे गटाच्या ४० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, आमदार महेंद्र थोरवेंवर मनमानीचा आरोप

उरण-पनवेल विधानसभा क्षेत्रात शिंदे गटातील अंतर्गत कलह विकोपाला गेल्यामुळे ४० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. जिल्हाप्रमुख अतुल भगत यांना बाजूला सारून त्या पदावर अचानक विनोद साबळे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे उरण-पनवेलमधील पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाचा भडका उडाला असून त्यांनी कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर मनमानीचे आरोप करीत आकांडतांडव केले आहे.

उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार महेश बालदी यांनी मित्रपक्षाला डावलून आपले उमेदवार स्वबळावर रिंगणात उतरले होते. यामुळे शिंदे गटानेही भाजपवर पलटवार करीत खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख अतुल भगत यांनी निवडणुकीत विरोधाची वाट धरली. प्रचारादरम्यान महेश बालदी आणि शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख अतुल भगत यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकी झाल्या. हा वाद कुठे मिटत नाही तोच आता शिंदे गटात अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे.

बालदींना हाताशी धरून खेळी केली
आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप, शिंदे गटातील दरी कायम राहिल्यास निवडणुकीत रंगाचा बेरंग होण्याचीच अधिक भीती निर्माण झाल्याने कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी जिल्हाप्रमुख अतुल भगत यांना पदावरून दूर करण्यासाठी पत्र दिले. त्यानंतर तडकाफडकी कार्यवाही करण्यात आली असल्यामुळे शिंदे गटाच्या ४० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. बालदी हे थोरवे यांना साथीला घेऊन ही राजकीय खेळी केली असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे उरण तालुका अध्यक्ष दीपक ठाकूर यांनी केला आहे.