
सामना ऑनलाईन । मुंबई
महसूल गुप्तचर संचालनालय विभागाने (डीआरआय) मोठी करवाई करत ड्रग्ज माफियांचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यात एकाच वेळी केलेल्या धाडसत्रात एकूण २५३ किलो केटामाईन आणि १२ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. या प्रकरणात १० जणांना अटक केली आहे. राष्ट्रीय बाजारपेठेत या ड्रग्जची किंमत जवळपास ५० कोटी रुपये आहे.
रायगड मधील रसायनी येथे एका कारखान्यामध्ये या ड्रग्जचे उत्पादन करून डिटर्जंट पावडर आणि फ्लोअर क्लिनरच्या नावाने मलेशियाला निर्यात केलं जात होतं. मलेशियातून सिंगापुर, व्हिएतनाम, अमेरिका आणि इतर देशांमध्ये पाठवला जात होतं. विशेषतः रेव्ह पार्ट्यांसाठी या ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
डीआरआयला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर एकाच वेळी रसायनी, खारघर आणि अंबरनाथमधये छापे टाकण्यात आले. या कारवाईत जगदिशन या उच्चशिक्षित म्होरक्यासह एन. प्रकाश, संजीव कासीम आणि देवप्रकाश उर्फ केविन यांच्यासह एकूण १० आरोपींना अटक केली आहे. या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाइंड जॅक हा मलेशियात असून, तो मलेशियातून सर्व व्यवसाय सांभाळतो. जवळपास चार महिन्यांपासून येथे ड्रग्ज बनवण्याचे काम सुरू होते आणि चार वेळा ड्रग्ज निर्यात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ड्रग्ज एक्सपोर्ट करण्यासाठी सोपे जावे म्हणून मुंबईजवळील परिसरात या ड्रग्जचे उत्पादन करून आशियाई देशांसह अमेरिकेत याची निर्यात केली जात होती. त्याचबरोबर मुंबईसह देशातल्या महत्त्वाच्या शहरांत हे ड्रग्ज पुरवले जात होते. या गोरखधंद्याची मोडस ऑपरेंडीही जबरदस्त होती. रासायनिक कारखान्याच्या नावाने ड्रग्जचे केलेले उत्पादन, डिटर्जंट पावडर आणि फ्लोअर क्लिनरच्या नावाने एक्सपोर्ट केले जात होते.





























































