इराण युद्ध लांबल्यास जगात अघोषित लॉकडाऊनचा धोका, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचे जगाला इंधन बचतीचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे जगभरात तेल आणि गॅसचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला आहे. हे युद्ध थांबण्याची शक्यता नसल्याने परिस्थिती आणखी बिघडण्याची चिन्हे असून जगात पुन्हा कोविडसारखे लॉकडाऊन लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने (आयईए) जगातील सर्व देशांना इंधन वापरात कपात करण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना महामारीमुळे पाच वर्षांपूर्वी जगात पहिल्यांदा लॉकडाऊन लागले होते. अवघे जग ठप्प झाले होते. इराण युद्धामुळे पुन्हा एकदा तशीच परिस्थिती उद्भवली आहे. दोन्ही बाजूंकडून तेलाचा शस्त्र म्हणून वापर केला जात आहे. अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून इराणने जगातील 20 टक्के तेल वाहतुकीचा मार्ग असलेली होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यातच तेल आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले सुरू केले आहेत. आखाती देशातील अनेक रिफायनरी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तेल उत्पादन आणि शुद्धीकरण थांबले असून कच्च्या तेलाचे भाव बॅरलमागे 100 च्या वर गेले आहेत. युद्ध न थांबल्यास परिस्थिती अधिक बिकट होणार आहे. यामुळे जगभरात अघोषित लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

आयईएने आधीच सावध होत जगातील देशांना ऊर्जा बचतीचे आवाहन केले आहे. जीवनशैलीत तात्पुरता बदल ऊर्जेची मोठी बचत करू शकतो. कोविड काळात ज्याप्रमाणे सर्वांनी निर्बंधांचे सामूहिक पालन केले, त्याचप्रमाणे आता सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे मत आयईएचे कार्यकारी संचालक फातिह बिरोल यांनी केले.

आयईएचा जगाला सल्ला

n शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होम सुरू करा
n  महामार्गावरील वेगमर्यादा कमी करा n  सार्वजनिक वाहतूक सेवेचा जास्त वापर करा n  पर्याय उपलब्ध असल्यास हवाई प्रवास टाळा. n वाहतुकीसाठी वापरला जाणारा गॅस स्वयंपाकाकडे वळवा
n  स्वयंपाकासाठी इलेक्ट्रिकवरील आधुनिक साधने वापरा n प्रवासासाठी कार शेअरिंगचा पर्याय वापरा

तेल-गॅसच्या उत्पादनात किती घट?

तेलाच्या रोजच्या उत्पादनात सुमारे 11 दशलक्ष बॅरलची घट झाली आहे. ही घट 1973 आणि 1979 च्या तेल संकटाच्या काळातील एकत्रित नुकसानीपेक्षा जास्त आहे. या काळात 10 दशलक्ष बॅरलचे नुकसान झाले होते. नैसर्गिक वायूच्या बाबतीतही परिस्थिती गंभीर आहे. सुमारे 140 अब्ज घनमीटर गॅसचा पुरवठा खंडित झाला आहे. हे नुकसान रशिया-युव्रेन युद्धामुळे झालेल्या नुकसानीच्या दुप्पट आहे. कतार आणि यूएईमधून होणारी गॅस निर्यात थांबल्यामुळे ही वेळ आली आहे.