रायनएअर खरेदी करू का? मस्क यांची युजर्सला विचारणा

सोशल मीडियावर सध्या इलॉन मस्क आणि रायनएअरचे सीईओ मायकल ओलेरी यांच्यात वाद निर्माण झाला आहे. मस्क यांनी एक्सवर एक पोल शेअर केला असून यात विचारले की, मी आयर्लंड एअरलाइन्स कंपनीची रायनएअर खरेदी करावी का? विमान कंपनी खरेदीसाठी मस्क यांनी थेट युजर्सला विचारणा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मस्क यांच्या या पोलला युजर्सनी भरभरून व्होट केले. 77 टक्के युजर्सने हो म्हटले. मस्क यांनी हा प्रश्न गमतीत विचारला की खरंच विचारला हे त्यांनाच माहिती आहे.

याआधी मस्क यांनी ओलेरी यांना थेट मूर्ख म्हटले होते. तसेच त्यांना कामावरून काढून टाकायला हवे, असेही म्हटले होते. हे सर्व घडण्यामागे ओलेरी यांनी रायनएअरच्या विमानांमध्ये मस्क यांच्या मालकीच्या स्टारलिंकचे इंटरनेट सेवा लावण्यास दिलेला नकार कारणीभूत ठरला आहे. रायनएअरच्या सीईओ यांनी मस्क यांचा हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर विमानाच्या केबिनच्या वर छताच्या अँटिनाच्या वजनामुळे इंधनाचा वापर वाढेल. कंपनीचा ऑपरेटिंग खर्च वाढेल. विमानातील प्रवासी एका तासासाठी वायफायवर पैसे कशाला खर्च करतील, असेही सीईओ यांनी म्हटले होते. त्यामुळे मस्क यांचा पारा चढला आहे. यावर बोलताना मस्क म्हणाले की, ओलेरी यांना चुकीची माहिती देण्यात आली आहे. रायनएअरचे प्रवासी त्यांच्या प्रतिस्पर्धी एअरलाइन्स कंपन्यांसोबत प्रवास करण्यास सुरुवात करतील, ज्यांनी आधीच स्टारलिंक सेवेसाठी साइनअप केले आहे, असे मस्क यांनी म्हटले होते.