
उत्तर लंडनमध्ये ज्यू समुदायाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या चार रुग्णवाहिका अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. गोल्डर्स ग्रीन भागात सोमवारी पहाटे 1.40 वाजता ही घटना घडली. सुदैवाने यात कुणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, या हल्ल्याची नोंद ज्यूविरोधी द्वेषपूर्ण गुन्हा म्हणून केली जात आहे. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
अज्ञातांनी ‘हत्झोला’ (Hatzola) या ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या चार रुग्णवाहिकांना लक्ष्य केले. या आगीमुळे रुग्णवाहिकेतील सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे शेजारील इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, अशी माहिती लंडन फायर ब्रिगेडने दिली. ब्रिटनचे आरोग्य सचिव वेस स्ट्रीटिंग यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
गेल्या काही काळापासून ब्रिटनमध्ये ज्यूविरोधी द्वेषपूर्ण गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अलीकडच्या काळात रोटरडॅम आणि ॲमस्टरडॅममध्येही अशाच प्रकारच्या ज्यूविरोधी घटना घडल्याचे कम्युनिटी सिक्युरिटी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी मार्क गार्डनर यांनी सांगितले.






















































