
लॉस एंजेलिसमधील कॅटालिना बेटावर छोटे प्रवासी विमान कोसळले. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. टाईम्स नाऊ ने न्यू यॉर्क पोस्टच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, हे विमान कॅटालिना बेटाच्या दक्षिण बाजूला अॅव्हलॉन शहरापासून काही अंतरावर कोसळले. विमानात दोन जण होते. दोघांचाही अपघातात मृत्यू झाला आहे.
लॉस एंजेलिस काउंटी अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास विमान अपघाताबाबत आपत्कालीन कॉल आला. यानंतर बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. बेटाच्या एका दुर्गम भागात सिंगल-इंजिन असलेले एक विमान कोसळले. या विमान दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रशासनाने या विमान दुर्घटनेची औपचारिक चौकशी सुरू केली आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड आणि फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन संयुक्तपणे तपास करत आहेत.



























































