
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली ‘चंदा’ अर्थात अभिनेत्री दीप्ती सोनावणे आता झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून खलनायिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यानिमित्ताने तिच्याशी केलेली बातचीत…
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेबद्दल काय सांगशील?
– या मालिकेबद्दल सांगायचे झाले तर शिक्षण मोठे की, पैसा मोठा यावर भाष्य करणारी ही मालिका आहे. तसेच अक्षरा आणि अधिपतीची खूप सुंदर अशी प्रेमकथा आहे.
तुझ्या भूमिकेबद्दल आम्हाला सांग…
– माझ्या भूमिकेबद्दल सांगायचे झाले तर मी ‘दुर्गेश्वरी’ नावाची खलनायिकेची भूमिका साकारत आहे. प्रेमकथेमध्ये खलनायिका ही खूप महत्त्वाचा भाग असते. हे पात्र माझ्यासाठी खूप वेगळे आणि मनोरंजक आहे. दुर्गेश्वरी ही भुवनेश्वरीची लांबची बहीण असते, ती आणि तिची मुलगी चंचला भुवनेश्वरीच्या घरी आश्रित म्हणून राहतात. चंचलाचे लग्न अधिपतीशी व्हावे म्हणून दुर्गेश्वरीचे खूप प्रयत्न चालू आहेत. आता पुढे काय होणार हे मालिकेमध्ये पाहायला मिळेल.
सहकलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे?
– या मालिकेची पूर्ण टीम खूपच चांगली आहे. आमचे एकमेकांबरोबर खूप छान
बॉण्डिंग झाले आहे. कुठच्याही मालिकेचे यश हे टीमवर्कवर अवलंबून असते आणि तशीच आमची टीम आहे.
तुझा आतापर्यंतच्या प्रवास कसा होता?
– मला सर्वात प्रथम झी मराठीचे खूप आभार मानायचे आहेत. कारण माझा पहिला प्रवास झी मराठीसोबतच सुरू झाला. झी मराठी हे माझे माहेर आहे. याच वाहिनीवरील माझी पहिली मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ होती. आता ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ माझी दुसरी मालिका. दोन्ही मालिकांमध्ये मला खूप मोठय़ा व मनोरंजक व्यक्तिरेखा साकारण्याची संधी या वाहिनीने दिली. आज मी जिथे कुठे उभी आहे ते या वाहिनीमुळेच.





























































