शेफ आणि अभिनेता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शेफ विष्णू मनोहर

आशुतोष पत्की. व्यवसायाने अभिनेता… शिक्षणाने शेफ. कुळीथाच्या पिठीसोबत इटालियन सँडविचेसही तितकीच प्रिय.

साधारणपणे आपण असं बघतो की, गाणाऱयाचा मुलगा गाणारा होतो. कुणी कलाकार असेल तर त्याचा मुलगा कलाकार होतो असंच आपल्याला बघायला मिळतं, पण आशुतोष पत्की याला अपवाद आहे. आशुतोषचे वडील अशोक पत्की यांना सगळा महाराष्ट्र ओळखतो. अशोकजींचा मुलगा मात्र थोडा चाकोरीबाहेर गेला आणि त्याने अभिनेता होण्याचं ठरवलं. पर्दापणातच त्याला ‘वन्स मोअर’ या मराठी चित्रपटात दुहेरी भूमिका मिळाली. सध्या त्याची मालिका ‘अगं बाई सासूबाई’ ‘झी मराठी’ चॅनलवर गाजते आहे. आशुतोषशी गप्पा मारायला वेगळ्या लंच डेटची गरज पडली नाही. आशुतोषला जेव्हा चित्रपट मिळाला त्यावेळी त्याचं वजन थोडं जास्त होतं, पण चित्रपटात जी भूमिका होती त्यामध्ये त्याला योद्धा म्हणून दाखविले आहे. त्याकरिता त्याने बरीच मेहनत घेऊन आपलं वजन कमी केलं आणि तो सडपातळ झाला. जेव्हा मी त्याला म्हटलं की, ‘‘तू खाण्यात असे काय बदल केलेस की, एवढं वजन कमी झालं?’’, तर तो म्हणाला, ‘‘मी कीटो डाएट सुरू केलं. त्यानंतर बाहेरचं खाणं सोडलं. शूटिंगलासुद्धा घरचाच डबा न्यायला लागलो.’’ आवडीच्या पदार्थांबद्दल विचारलं तर तो म्हणाला,‘‘मला सगळंच आवडतं, पण सँडविच आणि काही इटालियन पदार्थ जास्त प्रमाणात आवडतात. बोलता बोलता शिक्षणाचा विषय निघाला तेव्हा समजलं की, त्यानेसुद्धा हॉटेल मॅनेजमेंट या विषयात शिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळे त्यालासुद्धा वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतात. योगायोगाने आताच्या मालिकेतसुद्धा त्याची भूमिका किचन या विषयाशी जुळलेली आहे.

गप्पा मारत असतानाच आमच्या स्पॉटबॉयने गरमागरम दाल खिचडी, कांदा, लिंबू, पापड आणि त्याबरोबर अमूल बटरचा मोठा तुकडा आणून ठेवला. जेवणाबरोबर अमूल बटर हा माझा वीक पॉइंट. हे स्पॉटबॉयला कसं समजलं असे मी विचारल्यावर त्याने सांगितलं, ‘‘आजची दाल खिचडी आशुतोष सरांनी बनविली आहे आणि तुम्हाला जेवणात बटर आवडतं हेसुद्धा त्यांना माहीत आहे. आशुतोषने खरंच ती दाल-खिचडी छान बनविली होती.

आशुतोषला विचारलं की, ‘‘तू स्वतः शेफ आहे आणि तुला जेवणाची पण आवड आहे. तर तुला घरी कोणाच्या हातचा स्वयंपाक आवडतो?’’ त्यावर तो म्हणाला, आईने केलेल्या भातावरच्या पिठल्याची चव मी कधीही विसरू शकणार नाही.’’ त्याला विचारलं की, ‘‘तू हॉटेल मॅनेजमेंट केलं आणि मग अभिनयाकडे कसा वळला.’’ तर तो म्हणाला, ‘‘अभिनेता होण्याचा माझा पूर्वीपासूनच विचार होता.’’  जर मी अभिनेता झालो नसतो तर शेफ झालो असतो.’’ आमच्या गप्पा सुरू असतानाच शूटिंगची वेळ झाली आणि गप्पा आवरून कामाला लागलो.

भातावरचं कुळीथ पिठलं
साहित्य – 2 वाटय़ा तांदूळ, 1 वाटी कुळीथ, अर्धी वाटी दही, पाव चमचा हळद, चवीनुसार तिखट, 1 चमचा मोहरी, पाव चमचा हिंग , 1 चमचा जिरे, 4 चमचे कोथिंबीर, चवीनुसार मीठ.

कृती – सर्वप्रथम कुळीथ, दही, मीठ एकत्र करून चांगले घाटून घ्या. नंतर थोडे मीठ घालून भात शिजवून घ्या. 80 टक्के भात शिजल्यावर त्यामध्ये तयार केलेले कुळथाचे मिश्रण घालून भात मंद आचेवर पूर्णपणे शिजवा. तोपर्यंत हिंग, मोहरी, हळद, जिरे, कोथिंबीर यांची फोडणी घालून ठेवा. सर्व्ह करतेवेळी त्यावर फोडणी घालून भात सर्व्ह करा. बरोबर सांडगा किंवा मिरची द्या.

दाल तडका
साहित्य – 1 वाटी तुरीची डाळ, 1 चमचा जिरे, 1 चमचा लसूण, 4-5 हिरवी मिरची, पाव वाटी कांदा, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद , 1 नग टॉमेटो, चवीनुसार तिखट,  4 चमचे कोथिंबीर.

कृती – यासाठी अगोदर नेहमीप्रमाणे दाल फ्राय करून घ्या. त्याकरिता फ्राय पॅनमधे तेल गरम करून त्यात जिरे, बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची, कांदा घालून चांगले परता. नंतर थोडे बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर हिंग, हळद घालून शिजवलेले तुरीच्या डाळीचे वरण घाला. चवीनुसार मीठ घालून सर्वात शेवटी टॉमेटो घाला. तडक्यासाठी फ्राय पॅनवर तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, बारीक चिरलेला लसूण, तिखट व कोथिंबीर घाला व हा तडका तयार दाल फ्रायवर घाला.

चिजी टोस्ट सँडवीच

साहित्य – ब्रेड स्लाईस 4-5, उकडलेले बटाटे 2, टोमॅटो 1, काकडी 1, चीज क्युब पाव वाटी, मीठ चवीनुसार, मिरपूड अर्धा चमचा, बटर 2 चमचे, टोमॅटो सॉस 4 चमचे.

कृती – एका ब्रेड स्लाईसवर उकडलेल्या बटाटय़ाची एक चकती, टोमॅटोची एक चकती व काकडीची एक चकती ठेवावी. नंतर त्यावर एक चीजचा चौकोनी तुकडा ठेवावा. चीज ठेवण्यापूर्वी आवडीप्रमाणे मीठ व मिरपूड भुरभुरावी. वरून दुसरी ब्रेडची स्लाईस ठेवून थोडे बटर लावावे व हे सँडविच टोस्टरमध्ये ठेवून खरपूस भाजावे. नंतर बाहेर काढून त्याचे दोन भाग करून सॉसबरोबर खायला द्यावेत.

[email protected]