दत्तउपासना। बलोपासना।।

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वरद चव्हाण

मंदार जाधव… जेव्हा एखादी पौराणिक भूमिका करायची असते तेव्हा शरीरयष्टीची विशेष काळजी घ्यावी लागते….

नमस्कार फिटनेस फ्रिक्स! सध्या हिंदी व मराठी मालिकांचा ट्रेण्ड तुम्ही पाहिलात का? टिपिकल सास-बहु ड्रामापासून आता प्रेक्षक लांब गेलेले दिसतात. 80-90सालानंतर टिव्हीवर पुन्हा एकदा काळ आलाच तो ऐतिहासिक व पौराणिक मालिकांचा. ह्या मालिकांसाठी प्रत्येकालाच खूप मेहनत घ्यावी लागते. तांत्रिकदृष्टय़ा पण या मालिकांचा कॅनव्हास अफाट असतो. अशा मालिकांमध्ये जर तुमची मुख्य भूमिका असेल आणि तीसुद्धा एका अशा देवाची ज्याचे लाखो-करोडो भक्त आहेत तर तुमच्या अभिनयासोबत तुम्ही स्वतःला फिट ठेवणे हेसुद्धा एक चॅलेंज आहे. कारण अशा मालिकांमध्ये बऱयाच वेळा नटाला शरीरयष्टी दाखवावी लागते आणि म्हणूनच आज तुमच्यासमोर एका अशा कलाकाराचा लेख सादर करतोय ज्याची ‘श्री गुरुदेव दत्त’ ही मालिका सध्या ‘स्टार प्रवाह’वर लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. हो, आजचे आपले लाडके सेलिब्रेटी आहेत ‘मंदार जाधव!’

शाळेत असल्यापासून मंदार शाळेच्या क्रिकेट टीममध्ये खूप ऍक्टिव्ह होते. दादरच्या ‘शारदाश्रम’ शाळेत ते शिकत होते. क्रिकेटमधले त्यांचे गुरू एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी क्रिकेटचा देव म्हणजेच सचिन तेंडुलकर अख्ख्या जगासमोर आणला त्या रमाकांत आचरेकरांच्या कोचिंगमध्ये आपले मंदार जाधव क्रिकेटचे धडे घेत होते. आचरेकर सर अतिशय शिस्तप्रिय होते. त्यामुळे क्रिकेटच्या सरावाआधी व्यायाम आणि त्यानंतर क्रिकेटचे धडे हे नियमितपणे होत असत. या काळात आपण एक अभिनेता व्हावा असे मंदारला अजिबात वाटत नव्हते. पण रोज शिवाजी पार्कला जाण्याआधी मंदार एका देवळात जात असे. त्या देवानेच बहुदा मंदारच्या आयुष्याचा मार्गच बदलला. ते देऊळ कुठल्या देवाचे होते माहिती आहे का? तुम्ही ओळखले असेलच, पण हा सस्पेन्स राहू दे थोडा वेळ. पुढे माझ्या लेखात मी ते सस्पेन्स ओपन करीन. नंतर रूपारेल कॉलेजमधून मंदारने एनसीसी जॉईन केलं. आर्मीमध्ये जाऊन देशाची सेवा करणे हे मंदारचे ध्येय होते. म्हणजेच शाळेत असताना क्रिकेट व कॉलेजमध्ये एनसीसी यामुळे मंदारची ऍथलिट बॉडी होती. मंदारच्या बाबांना व लहान भावाला अभिनयाची खूप आवड होती. त्याच्या लहान भावाला चाइल्ड ऍक्टरचा ‘म. टा. सन्मान’देखील मिळाला आहे. असाच एकदा मंदार त्याच्या लहान भावाबरोबर एका निर्मात्याकडे गेला होता. तेव्हा त्या निर्मात्यानेच मंदारला हीरोचा रोल ऑफर केला आणि मंदारनी अभिनेता व्हायचे ठरवले. कोणाच्या नशिबात काय लिहिले असेल हे सांगता येत नाही ना? 2007 साली मंदारने ‘अल्लादीन’ नावाची पहिली हिंदी मालिका केली. याशिवाय ‘वीर शिवाजी’, ‘महावीर हनुमान’सारखे अनेक हिंदी पौराणिक मालिकांमध्ये तो झळकला. एरवी खेळासाठी व्यायाम करणारा मंदार आता मात्र एक अभिनेता म्हणून स्वतःच्या शरीराकडे लक्ष देऊ लागला. रोज शूटिंगला जाण्याआधी तासभर जिमला जाणे हा मंदारच्या आयुष्याचा भाग झाला. आजवर मंदारने एकही पर्सनल टेनर किंवा डायटीशियन ठेवला नाही. स्वतःला आलेल्या प्रत्येक अनुभवातून धडे घेत मंदारने स्वतःचा व्यायामाचा रुटीन सेट केलाय व आहारसुद्धा त्यानुसार आखला.

अनेक हिंदी मालिकांनंतर मंदारला प्रतीक्षा होती ती एका मराठी मालिकेची. आता हा एक योगायोग म्हणा किंवा देवाचा आशीर्वाद म्हणा. शिवाजी पार्कला क्रिकेट कोचिंगला जाण्यासाठी मंदार ‘श्री गुरुदेव दत्तांच्या’ देवळात जात असे. मंदारचा ठाम विश्वास आहे की दत्तांच्या इच्छेमुळेच त्याला ही भूमिका मिळाली आहे. मिळालेल्या संधीचे सोने करणे व या संधीला अजिबात गृहीत न धरणं या मताचा मंदार आहे आणि म्हणूनच त्याच्या शूटिंगच्या वेळा अशा आखल्या गेल्या आहेत जेणेकरून मंदारला सकाळी कमीत कमी एक ते दीड तास जीममध्ये जाऊन व्यायाम करता येईल. दत्तगुरूंच्या वेशभूषेत व्यायाम करणे शक्य नसल्यामुळे शूटिंग सेटवर व्यायाम करणे शक्य नाही. त्याचबरोबर शूटिंगच्या सेटवरच जेवण न जेवता मंदार स्वतःचा डबा घरुन घेऊन येते. आहारामध्ये विविध सॅण्डवीच, सलाड, फ्रूटस्, प्रोटीन शेक, प्राऊटस्, चणे, डाळ, ब्राऊन राइसचा समावेश असतो. प्रत्येक दोन तासाने त्याचे खाणे ठरलेले असते. दत्तगुरूंच्या वेशात असताना मंदार अजिबात मांसाहाराला हात लावत नाही. मंदारला हे प्रत्येकाला सांगावसे वाटते की, योगासने किंवा चालण्यासारखा दुसरा कुठलाच व्यायाम नाही. देवासमोर हात जोडून मोठा श्वास घेऊन श्वास संपेपर्यंत ‘ओम्’चा जप केला तरीही आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटते. आशा करतो तुम्हाला हा लेख आवडला असेल. हा लेख जरी थोडा अध्यात्माकडे झुकणारा असला तरीही ‘ओम्’ या मंत्राने युनिव्हर्समध्ये होणारे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन हे जगाने मान्य केलेय हे विसरून चालणार नाही.

[email protected]