यह!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मिलिंद शिंदे

नागेश भोसले… अचूकतेचा ध्यास… हिंदी, इंग्लिश… उर्दू भाषांवर प्रभुत्व… आणि नाटय़, चित्रपट, मालिकांसकट अभिनय… दिग्दर्शनात चौफेर वावर…

मॉनिटरवर बसून कॅमेरामनला शॉट समजावतात, तेव्हा कॅमेरामन त्यांना हव्या असलेल्या शॉट साईजला येतो, स्थिरावतो आणि त्यांना वाटतं की हाच आपल्याला हवा असलेला शॉट आहे, ते कॅमेरामनला थांबवतात न म्हणतात…‘यह’यह म्हणजे हेच, हेच पाहिजे, असंच पाहिजे, इतकंच पाहिजे. ते नाही, तेही नाही, ते तर नकोच या सगळय़ा धांडोळय़ातून आलेला ‘यह’.
या ‘यह’चा आग्रह धरणारे अभिनेते – दिग्दर्शक नागेश भोसले.

चालताना जणू एक वाघच चालतोय असा फील यावा. जर आपण या माणसाच्या वाटेत आलो तर आपल्याला एकतर ओरडा खावा लागणार किंवा एखादा फटका तरी. असं वाटावं अशी दहशत…’ अनेकांना वाटतं असं की हा माणूस फार रुड आहे, इ.इ. काहींना तर तो गर्विष्ठही वाटतो. मग एकतर ते त्यांच्याशी बोलत नाहीत किंवा वाट वाकडी करून निघून जातात. कारण ते स्पष्ट आहेत. थेट, तीक्ष्ण आहेत, आग्रही आहेत. लोकांना असं का वाटतं, त्याचा उलगडा मी पुढे करीनच.

खचाखच भरलेलं नेहरू सेंटरचं मुख्य सभागृह. त्या नाटकाला असलेल्या प्रेक्षक पसंतीची दाद देत होतं. पडदा उघडताक्षणी प्रेक्षकांनी केलेला जल्लोष मी आजही पाहू शकतो. त्या महोत्सवात माझंही नाटक होतं. म्हणून मला आत शिरता आलं. नाहीतर त्या नाटकाला तिकीट, पास मिळणं दुरापास्तच. मी संपूर्ण नाटकभर एकाच माणसाला पहात होतो,
‘‘काय गातात नागेश भोसले.’’
अशी नाटय़गृहाच्या बाहेर चर्चा होती. मी तर हरवूनच गेलो होतो, त्या त्यांच्या एकूणच असणाऱया ‘हुनर’वर… अप्रतिम गायकी. रंगमंचासाठीची अतिशय उजवी. काही बोटांवर मोजावी इतकीच नावं आहेत की, जी मराठी मंडळी पृथ्वीसारख्या सर्वदूर पसरलेल्या चळवळीत अगदी अग्रमानांकीत आहेत. त्यातलं अतिशय वरच्या क्रमांकाचं नाव म्हणजे नागेश भोसले. सेक्स, मोरॅलिटी ऍण्ड सेंसॉरशिप, राशोमन ब्लूज आणि कॉटन 56 पॉलियेस्टर 8ए ज्या नाटकासाठी नागेश यांना महिंद्रा यांचं ‘एक्सलंन्स इन थिएटर ऍवॉर्ड’ मिळालं. हिंदी सिनेमा, नाटक यामधलं एक मोठं प्रस्थ म्हणून नागेश भोसले यांची गणना होते.
‘नाती खेळ?’ मी फोन करून विचारलं नागेश भोसले यांना. कारण मला समजलं होतं की ते राजन खान यांच्या ‘नाती खेळ’ या दीर्घकथेवर सिनेमा करतायत. इथपर्यंत आमची ओळख होती, पण आम्ही काम मात्र एकत्र केलं नव्हतं. ‘नाती खेळ’ ही कथा मी वाचली होती आणि त्यातला सदाशिव ही भूमिका मी करावी असं मला मनोमन वाटत होतं. पण कोण कधी या कथेला हात घालेल आणि कधी या कथेवर सिनेमा येईल आणि कधी आपण करू ही बऱयाच वर्षांची इच्छा मनात होती. मला सिनेवर्तुळातून बातमी समजल्याबरोबर मी नागेश भोसले यांना फोन केला.
‘नाती खेळ?’
नागेश भोसले यांचं पलीकडून उत्तर आलं.
हो.
मग बराच वेळ शांतता. मीही काही बोललो नाही. ना तेही…
‘Monosyllabic’ (मोनोसिलॅबिक) म्हणता येईल (त्रोटक) असं आमचं संभाषण. ज्यामध्ये म्हटलं तर खूप अर्थ आहे आणि नाहीही.
मला ती भूमिका मिळाली असं मला मनोमन वाटायचं. कारण काही कथा तुमच्या मनाच्या कुपीत ठाण मांडून बसलेल्या असतात. साधारण आठवडाभरात माझ्या फोनवर ‘नागेश भोसले’ हे नाव चमकू लागलं.
‘‘करोगे नाती खेळ में काम?’‘रोल कोणता…?’ मी उत्सुकतेपोटी विचारलं.
‘वही सदाशिव’…
मला भारी वाटलं. कसं ना जुळून येतं. याचा प्रत्यय आला आणि तुमची गरज, तुमची उपलब्धता दाखवा. वाट, वाटा असतात. कुणीतरी वाट घेऊन येतोय. नागेश भोसले आले आणि ठाण मांडून बसलेला ‘सदा’ बाहेर आला आणि नागेश भोसले यांच्याशी गप्पा मारू लागला. फार अवधी नव्हता. तयारी सुरू झाली आणि आम्ही चित्रीकरणस्थळी भेटलो. मी म्हटलं, ‘मियाँ पाच मिनिट दे दो… थोडी बात करनी है.
हां हां… बोलो.
नागेश भोसले यांचं जितकं मराठी चांगलं त्याहून हिंदी आणि इंग्लिशही. ‘टॅजेक्टरी’ हा शब्दही पहिल्यांदा त्यांच्या तोंडून ऐकला, नेटवर शोधला, अर्थ जाणून घेतला. तर, मी त्यांना म्हणालो, काही सांगा, तुम्हाला कसा हवाय सदा… मग त्यांनी काही गोष्टी सांगितल्या… मग ते म्हणाले, ‘यह’ आणि चित्रीकरणाला सुरुवात झाली.
संपूर्ण पंधरा दिवसांच्या शेडय़ूलमध्ये नागेश भोसले यांनी एकदाही मला ते मोठे दिग्दर्शन आहेत आणि मी त्यांना ज्युनियर आहे असं जाणवू दिलं नाही… आपल्या पेशाशी प्रामाणिक असणारा आणि आपल्या नटांवर अपार विश्वास असणारा हा दिग्दर्शक… नागेश भोसले. मी विचारलं लोक उद्धट म्हणतात तुम्हाला. रूड म्हणतात. त्यावरचं त्यांचं उत्तर मी मघाशी म्हणल्याप्रमाणं उलगडा करीनच. ते मला त्यांच्याच तोंडून करायचा होता. उत्तर मला इतकं भावलं की बस्स…
‘यहां लोगो को बोलो की तुम गलत कर रहे हो , या तुम गलत हो, तो लोग आपको ऍरोगंट बोलते है.’
दोनशे टक्के खरं… नागेश मियां.
नागपुरात वाढलेल्या नागेश यांची उर्दू जुबान (तलफ्फुस) एकदम जानदार आहे. या मोठय़ा यशस्वी प्रवासाचं श्रेय ते स्वतःकडे अजिबात घेत नाहीत… संपूर्ण श्रेय ते आपल्या प्रिय पत्नी जॉय भोसले (ज्या पेशानं आर्किटेक्ट आहेत) यांना देतात. या लेखनप्रपंचाच्या निमित्ताने जेव्हा नागेश यांना भेटलो तेव्हा जॉय यांना इस्पितळात दाखल केलं होतं. त्या आयसीयूमध्ये होत्या.
‘‘तुम्हारी जगर कोई और इंटरह्यू मांगता तो मैं मना कर देता.’’
हे नागेश यांचं वाक्य मला खूप जबाबदारी देऊन गेलं.
मागच्या तीन रात्री आणि तीन दिवस ते झोपले नव्हते. पूर्ण वेळ आपल्या पत्नीसोबत इस्पितळात त्यांनी शुश्रुषा करत होते. मी भेटायला गेल्यावर इस्पितळाच्या रिसेप्शनला मी पाहिलं. जणू काही एखादा दाक्षिणात्य सुपरस्टार भासावा असे नागेश मला वाढलेल्या दाढीवर आणि काळय़ाशार गॉगल्स (शेड्स)वर दिसले
त्यांच्यासाठी जॉय भोसले सर्वात अग्रस्थानी आहेत. ‘मै जब कुछ नही था, तबसे ये मेरे साथ है, और हमेशा है.’
भान असलेला नट याहून काय वेगळं असतो…? मियाँ नागेश.
मी वयानं लहान आहे पण काहीतरी आहे जे आपल्याला बांधून ठेवतं. पण मला नेहमी वाटतं तुम्हाला आवडो वा न आवडो तुमचा इंडस्ट्रीमधला डय़ू बाकी आहे अजून. तुम्ही अभिनयाची खाण आहात ती कुणी चॅलेंज करायला येत नाही. माझ्या या विधानाशी आपण सहमत नसाल, पण मी पाहिलीय त्या डोळय़ांमधली ‘हंगर’. त्यांना खूप बोलायचंय, सांगायचंय, व्यक्त व्हायचंय. त्यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून ते करतीलही ते, पण ज्या दिवशी ते स्वतःलाच म्हणतील ‘यह’. एक अद्वितीय कलाकृती समस्त रसिक वर्गाला मिळेल… आणि रसिकही म्हणतील ‘हेच’ ‘यह’.