मुलाखत – सकारात्मकता वाढली

1222

लॉकडाऊनमध्ये मला अनेक चांगल्या सवयी लागल्या. ज्या अनलॉकमध्येही मी कटाक्षाने पाळते आहे…. सांगत आहे अभिनेत्री प्रार्थना बेहरे

लॉकडाऊनआधी खूप काही गोष्टी शिकायच्या होत्या त्या शिकले. खूप काही गोष्टी स्वतःमध्ये होत्या आणि त्या गोष्टींसाठी वेळ देता आला. पेण्टिंग आणि ड्राइंग जे अनेक वर्षे बंद केले होते ते करायला लागले. त्यानिमित्ताने माझ्या आवडत्या छंदासाठी वेळ द्यायला मिळत होता. मला आणि अभीला एकमेकांसोबत वेळ घालवता येत नव्हता तो घालवता आला. क्रिएटिव्ह गप्पा मारता आल्या. त्यामुळे खूप मजा आली. त्यामुळे आता जोमाने काम करायचा उत्साह आला आहे. सगळ्या गोष्टींना दोन बाजू असतात. एक चांगली बाजू आणि एक वाईट बाजू. कायम वाईट बाजूचाच विचार करत बसलो तर आपल्याला नैराश्य येतं. त्यामुळे मी कोरोनाच्या काळात सकारात्मक राहिले. म्हणजे मला त्याची झळ पोहोचली नाही असे नाही. पण हे माझ्या एकटीवर संकट नव्हते. संपूर्ण जगावर हे संकट आलं आहे. त्यामुळे कुठेही निराश न होता आपण यावर मात करू असाच विचार करायचे आणि हातातला वेळ आनंदाने घालवला कारण पुन्हा अशी सक्तीची सुट्टी मिळणार नाही.

अजूनही घराच्या बाहेर निघताना हात सॅनिटाइज करून मास्क घालून बाहेर पडतो. गरज असेल तरच बाहेर पडतो. आता शूटिंग सुरू असल्याने सेट आणि घर एवढेच असते. बाहेर पडलो तरी कामापुरताच पडतो. उगाच गर्दी करायला मार्केट, मॉलमध्ये जात नाही आणि मला वाटतं कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत बाहेर गरज असेल तरच पडलेले बरे. जेव्हा लॉकडाऊन सुरू झाले होते तेव्हा दीड महिना मी माझ्या आई-बाबांकडे बडोद्याला अडकले होते आणि मग मुंबईत आले. त्या सगळ्या काळात जेव्हा मुंबईत घरी आले तेव्हा आधी बाहेरून घरात आल्यावर वाफ घ्यायची आणि नंतर आंघोळ करायची. त्याच्याशिवाय कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही. हा आम्ही नियमच लावून घेतला होता. ते अजूनपर्यंत आम्ही कटाक्षाने पाळतो. आजही बाहेरून घरात आल्यावर आधी वाफ घेतो आणि लगेच आंघोळीला जातो, मग गरम काढा पितो. दिवसभरात फक्त गरम पाणी पितो. बाकी कुठलेच पाणी नाही.

शूट करताना सेटवर सगळे काळजी घेतात. सतत सॅनिटाइझ केले जाते, मेकअप, हेअरसाठी पीपीई कीट घालून असतात. तालमीच्या वेळीही आम्ही मास्क लावूनच तालीम करतो. टेकच्या वेळी मास्क काढतो. अशी वेगवेगळ्या पद्धतीने आमची आणि आमच्या सहकाऱयांची काळजी घेतली जाते आणि त्याची गरज आहे.

कोरोनाने आपल्याला जसे संयम, स्वच्छता आणि सकारात्मक राहायला शिकवले तसे नेहमी सकारात्मक राहा. नकारात्मक गोष्टी घेतल्या तर त्याचा आपल्यालाच त्रास होतो. त्यामुळे सकारात्मक राहा, आनंदी राहा. माझा आनंद भौतिक सुखात नाही, माझा आनंद माझ्या आत आहे हे मी ठरवले आहे आणि तुम्हीही तसेच राहा. स्वच्छता कोरोनानेच शिकवले. लोक बाहेर पडत नव्हते त्यामुळे अस्वच्छता दिसत नव्हती, ट्रफिकचा त्रास नव्हता. त्यामुळे स्वच्छता राहत होती. आता ही स्वच्छता लॉकडाऊननंतरही कायम ठेवायची आहे.

आपली प्रतिक्रिया द्या