
व्यावसायिक कारकीर्दीत सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही भूमिका वठवण्याची संधी मिळाली. त्या त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करताना माझी आणि साहित्याची नाळ जुळली गेली. भूमिकेच्या होमवर्कसाठी मी सातत्याने नवनवीन साहित्य वाचायला लागलो… सांगताहेत अभिनेता अशोक समर्थ.
माझ्या मते कलाकाराच्या व्यावसायिक कारकिर्दीत त्याला मिळणाऱया, त्याने साकारलेली प्रत्येक भूमिका त्याला काही ना काहीतरी दान देऊन जाते. नवीन काही शिकवून जाते. मी खात्रीने सांगू शकतो की, जर मी अभिनेता झालो नसतो तर आता ज्या पद्धतीने मी माणूस म्हणून घडलोय त्या पद्धतीने घडलो नसतो. व्यावसायिक कारकिर्दीत सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही भूमिका वठवण्याची संधी मिळाली. त्या त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करताना माझी आणि साहित्याची नाळ जुळली गेली. भूमिकेच्या होमवर्कसाठी मी सातत्याने नवनवीन साहित्य वाचायला लागलो. त्यातून वेगवेगळी माणसं मला पुस्तकातून भेटत गेली आणि माझ्याही नकळत मी एका वेगळ्या अर्थाने घडत गेलो, घडतोय आणि घडत राहीन. कोणतीही भूमिका माझ्याकडे आली की, त्या भूमिकेचं आणि माझं मनातल्या मनात एक अनामिक द्वंद्व सुरू होतं. मग तो ‘रणांगण’मधला अफझली, जो स्वतःच्या देशासाठी प्राणपणाने लढत होता. बलुचिस्तानवरून पानिपतवर तो आक्रमण करायला आला होता. अफझली ही व्यक्तिरेखा मला बरंच काही शिकवून गेली. फार आगळावेगळा अनुभव होता तो.
‘सिंघम’मधील शिवा नायक ही आणखीन एक व्यक्तिरेखा. इतरांच्या चुका स्वतःच्या माथ्यावर घेऊन स्वतःचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होऊ शकतं हे शिवाने दाखवून दिलं.
कोणताही प्रसंग असो, क्षणिक मोहाला बळी न पडता सारासार विचार आणि विवेकबुद्धीने माणसाने वागायला हवं, नाहीतर मग अस्त अटळ आहे हे ‘एक चालीस की लास्ट लोकल’मधील मालवणकरने दाखवलं आणि आता नुकताच प्रदर्शित होणारा ‘रावरंभा’ हा चित्रपट… त्यातील माझी भूमिका सरनोबत प्रतापराव गुजर ! ‘वेडात मराठी वीर दौडले …’मधील एक ध्येयाने वेडा झालेला सरदार. आपल्या राजाला, छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेला शब्द पाळण्यासाठी स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता तळहातावरती प्राण घेऊन निघालेला एक ध्येयवेडा शूरवीर. जेव्हा मी या भूमिकेविषयी ऐकलं, वाचलं तेव्हा मी मंत्रमुग्ध झालो. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याप्रति आणि स्वराज्याच्या प्रति असलेली निष्ठा, शौर्याची, त्यागाची आणि समर्पणाची किनार या सिनेमात आहे, जो येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतोय.
शब्दांकन : निनाद पाटील
























































