थोरामोठ्यांच्या सहवासात…

>> रोहिणी निनावे

आजचा दिग्दर्शक, अभिनेता अद्वैत दादरकर. उत्तम संगतीचा नेहमीच लाभ होत असतो. अद्वैतचे प्रामाणिक काम त्याच्यावरील ठाशीव संस्कारांचेच प्रतीक आहे.

कुठलीही कला ही अर्जित केली जाऊ शकते, पण त्यात निष्णात असण्यासाठी प्रतिभा असण्याची ही गरज असते. जी देवदत्त असते.. अनुवंशिक असते..!.. आपल्या क्षेत्रात अनेक कलाकार असे आहेत ज्यांना साहित्यिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. वडिलधायांचा त्यांना वारसा लाभला आहे. आणि लाभले आम्हास भाग्य जन्मलो यांच्या घरी..असे म्हणावेसे वाटते. मला ही नेहमीच वाटते की वडील साहित्यिक असल्यामुळे माझी जडण घडण साहित्यिक वातावरणात झाली. हे सांगण्याचं कारण म्हणजे आज मी ज्याची मुलाखत घेणार होते तो माझ्या वडिलांच्या मित्राचा, सुप्रसिद्ध नाटककार, संपादक स्व. विद्याधर गोखले यांचा नातू आहे.. अद्वैत दादरकर!

अद्वैत माझ्या घरीच आला होता.. आणि गप्पांना कधी सुरुवात झाली ते कळलंच नाही. आजोबांचा उल्लेख निघाल्यावर अद्वैत म्हणाला आजोबांमुळे घरात साहित्यिक वातावरण होतं, माणिक वर्मा माझी आत्या असल्याने घरात संगीतही होतं. घरात संगीत नाटकांच्या तालमी व्हायच्या… भालजींसारख्या दिग्गज माणसांचं घरात येणं -जाणं होतं.कानावर सगळं चांगलंच पडत होतं. मी विद्रोह करत वेस्टर्न म्युजिक मध्ये इंटरेस्ट घ्यायला लागलो, मला बाबा सहगल वगैरे आवडायला लागले, कुठे पब मध्ये जा, क्रिकेटच खेळ..असं काही काही करत असताना एका नाटकाच्या ऑडिशनलाही गेलो होतो तेव्हा विद्याताईंनी याला काही येत नाही म्हणून मला हाकलूनही दिलं होतं, त्यामुळे नाटकात वगैरे करिअर करण्याचं मनात नव्हतं.

नाटकाचं एक वेगळंच स्कूल मला बघायला मिळालं. नाटक प्रकाराचा सिरियसनेस मला कळू लागला. याच दरम्यान माझी मैत्रीण इरावती कर्णिक मला म्हणाली तू दिग्दर्शनाचा प्रयत्न का करून बघत नाहीस? मी म्हटलं माझा पिंड नाही ग..पण तिने भरीस पाडल्यावर म्हटलं चला प्रयत्न तर करून बघू या. मग मी ’ एक लेखकू लिहिता लिहिता ’ ही एकांकिका दिग्दर्शित केली,जी चांगलीच गाजली. मला दिग्दर्शक म्हणून लोक ओळखायला लागले. मग आम्ही तरुण मंडळींनी मिथक नावाची एक संस्था स्थापन केली आणि नाटकं बसवायला सुरुवात केली. असंच आम्ही एक नाटक करायचं ठरवलं, पण लेखक मिळेना मग नाईलाजाने मीच ते नाटक लिहिलं. ते नाटक म्हणजे ‘मायक्रोवेव्ह चकणा’ ती एकांकिका पण लोकांना आवडली, तेव्हा जाणीव झाली की आपण लिहू शकतो.

मी विचारलं व्यावसायिक नाटकांची सुरुवात कधी झाली? अद्वैतनी सांगितलं सुधीर भटांनी मला नाट्य-दिग्दर्शनाची पहिली संधी दिली..’’जावई माझा भला “ या नाटकाद्वारे!.. विक्रम गोखले, जयंत सावरकर यांच्यासारखे जेष्ठ आणि श्रेष्ठ नट त्यात होते, मी वयाने लहान असल्याने त्यांना दिगदर्शन करण्याचं काहीसं टेन्शन आलं होतं, पण त्यांनी मला सांभाळून घेतलं. मला नवशिक्या सारखं न वागवता दिग्दर्शका सारखंच वागवलं! इतक्या मोठया नटांबरोबर काम केलंस तू, कसं काय मॅनेज केलंस तू? अद्वैत म्हणाला, ती कला पण यायला हवी, त्यांच्याकडून आपल्याला हवं तसं काम काढून घेता आलं पाहिजे, जे हवं ते काढून घेऊन आणि जे नको ते मागे सोडायला लावून..त्यासाठी तो नट माणूस म्हणूनही आधी कळून घ्यावा लागतो, तरच तुम्ही त्याला सांभाळून घेऊ शकता! त्याची बलस्थानं ओळखून, त्यांचा इगो सांभाळून!

मी विचारलं प्रशांत दामलेंसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? अद्वैत म्हणाला अफलातून. त्या माणसाची शिस्त, कामाप्रती समर्पण, वक्तशीरपणा हे सगळंच वाखाणण्याजोगं आणि शिकण्याजोगं आहे. मी विचारलं तुला विनोदी किंवा हलकी फुलकी नाटकं हल्ली जास्त चालताना दिसतात.. तेव्हा हलकी फुलकी नाटकंच करायची आहेत की सिरिअस नाटकंही? अद्वैत म्हणाला असं काही नाही, मला सर्व तऱ्हेची नाटकं करायला आवडेल. पण सिरिअस विषय हलक्या फुलक्या पद्धतीने मांडणं, हे आव्हान आहे. कडू गोळी गोड सरबताबरोबर देण्यासारखं आहे. नाटक कुठल्याही पद्धतीचं असो. त्यात काही तरी सांगण्यासारखं हवं. आणि मुख्य म्हणजे ते कन्टेम्पररी, आजची गोष्ट सांगणारं हवं.. जुन्या गोष्टींना, विचारांना, समजुतींना छेद देणारं हवं. जे इतर माध्यमात मांडता येत नाही ते इथे मांडण्याचा प्रयत्न हवा.

मी म्हटलं सध्या वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स वगैरेंचं प्रस्थ वाढत चाललं आहे, अशा वेळी नाटकांवर त्याचा परिणाम होतो आहे असं वाटतं का? अद्वैत म्हणाला मला नाही वाटत. एखादी गोष्ट प्रत्यक्ष बघण्यात जी मजा आहे ती पडद्यावर बघण्यात नाही! मी म्हटलं या प्रत्यक्ष अनुभवाची काही गम्मत आहे का सांगण्यासारखी? तेव्हा अद्वैतने सांगितलं की आम्ही वदनी कवळ घेता हे नाटक करत होतो. त्या नाटकाची सुरुवातच प्रेतापासून होते. त्या अतिहौशी कलाकाराने दोन्ही नाकपुड्यांमध्ये कापूस घातला होता. पूजेच्या वेळेस लावलेल्या अगरबत्तीच्या वासाने त्याला शिंक आली. नाकातला कापूस उडाला. नशीब नाटक सुरू व्हायला वेळ होता, म्हणून बचावलो, नाहीतर भर नाटकात एक प्रेत शिंकलं असतं. अजून ही त्या आठवणीने अद्वैतला हसू येत होतं.

मी विचारलं, नाटकांमध्ये काय बदल व्हायला हवा असं तुला वाटतं? अद्वैत म्हणाला आजही नाटक करताना फोर्टी प्लस वयोगटाच्या प्रेक्षकांचा विचार केला जातो.. तरुण पिढीच्या मनाचा, प्रश्नांचा ही विचार करणारे विषय हवेत. सादरीकरण मध्ये आता बदल होताहेत. नेपथ्य, संगीत, मांडणी यात नवनवीन प्रयोग होताहेत. मलाही खूप प्रयोग करावेसे वाटतात. ऑपेरा टाईप चं नाटक, भव्य दिव्य नाटक, अनेक पात्रांचं, ग्रँजर असलेलं.पण एकीकडे आपल्याकडे तेव्हढं बजेट नसतं, दुसरीकडे निर्मात्यांची रिस्क घेण्याची तयारी नसते, अर्थात त्यांना त्यांचा प्रॉफिट ही बघायचा असतो… हल्ली निर्मात्यांचा पहिला प्रश्न हाच असतो किती पात्रांचं नाटक आहे? कारण त्यांना डोळ्यापुढे दौरे, अभिनेत्यांची नाईट दिसत असते. तरीही आजवर स्टेजवर करणं,इम्पॉसिबल आहे, असं जे जे म्हटल्या गेलं आहे, ते ते करण्याची इच्छा आहे.

पुढे मी विचारलं की सिनेमा, मालिकांचं काय? अद्वैत म्हणाला सिनेमा करायचा आहे, पण त्यासाठी मला स्वतःला तयार करायचं आहे. फक्त एक चांगला कॅमेरामन घेऊन चला फिल्म करू या.. म्हणून दिगदर्शन करणायांपैकी मी नाही. आणि मालिका मी लिहून बघितल्या पण हे आपलं काम नाही हे मला कळलं. खरतर संवाद लिहिणं सोपं.. मी लक्ष्मणरेषा, तुझ्यावाचून करमेना वगैरे लिहून बघितलं, पण त्यात काही माझं मन रमेना. खूप काळ चालणारी कथा लिहिण्याचा पेशन्स आपल्यात नाही याची मला जाणीव झाली. मी काही मालिकांमध्ये काम ही केलं. पण माझ्या नव्रयाची बायको मधल्या सौमित्र या पात्रामुळे लोक मला चेहऱ्याने अधिक ओळखू लागले.

मी विचारलं तुझ्या या प्रवासात घरच्यांचा कसा सपोर्ट होता. अद्वैत म्हणाला माझ्या घरचे लोक मला कायम प्रोत्साहनच देत आले. आई वडिलांनी कधीच दबाव आणला नाही की आधी शिक्षण मग बाकीचं वगैरे. कारण घरातलं वातावरण! तसंच माझी बायको अभिनेत्री भक्ती देसाई याच क्षेत्रातली आहे, मीच तिचा पहिला दिग्दर्शक होतो. त्यामुळे ती मला समजून घेते, माझं ऐकते.. पुन्हा एक निखळ हास्य अद्वैतच्या चेहऱ्यावर तरळलं.

मी म्हटलं आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल तू समाधानी आहेस का? अद्वैत म्हणाला, म्हटलं तर हो, म्हटलं तर नाही. मला खूप कमी वयात यश आणि प्रसिद्धी मिळाली आहे. पण यश आणि प्रसिद्धी म्हणजेच सर्व काही नाही. मला खूप काही मनापासून करायचं असतं. एक असतं दुसऱ्यांसाठी, दुसऱ्याच्या मनाप्रमाणे काम करणं, एक असतं स्वतःला आनंद देणारं काम करणं. स्वतःला कामातून व्यक्त करणं, आपल्यातलं काही कलाकृतीमध्ये उतरवणं…!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या