
कोणत्याही सिनेमात नायकाइतकीच खलनायकाची भूमिकाही महत्त्वाची असते. अभिनेते गोविंद नामदेव यांनी गेल्या दोन दशकांत 100 हून अधिक सिनेमांत आपल्या दमदार अभिनयाने खलनायकाची भूमिका रंगवली आहे. बॉलीवूडमध्ये खलनायकाचीच भूमिका साकारायची हे मी आधीच ठरवले होते. याच भूमिकेने आपल्याला बॉलीवूडमध्ये ओळख मिळवून दिल्याचे ते सांगतात. आगामी ‘रंगीला राजा’ सिनेमानिमित्त त्यांच्याशी केलेली बातचीत.
रंगीला राजाविषयी सांगा…
– या सिनेमात अभिनेता गोविंदा मुख्य भूमिकेत आहे. गोविंदा ज्या कंपनीत कामाला असतो त्या कंपनीच्या सीईओची भूमिका मी साकारतोय. गोविंदाच्या वागण्यामुळे तो हैराण असतो. शेवटी तो गोविंदाच्या विरोधात जातो आणि पुढे काय होते हे तुम्हाला सिनेमात पाहायला मिळेल.
एनएसडीमधून कोर्स पूर्ण केल्यानंतरही सिनेमात पदार्पण करण्याऐवजी अकरा वर्षे तुम्ही नाटकांमध्येच काम केले, यामागचे कारण?
-सिनेमात मोठे स्टार समोर असतील तर आपण त्यांच्यासमोर आपला 100 टक्के परफॉर्मन्स देऊ शकतो का? असा प्रश्न मला पडायचा. स्कतःवरच विश्वास नसेल तर मायानगरी मुंबईत जाऊन काय उपयोग? त्यामुळे मी पुढील काही वर्षे दिल्लीतील राष्ट्रीय नाट्यविद्यालय रंगमंडळाच्या नाटकांत अनुभवी कलाकारांसोबत काम केले. देश-विदेशात नाटकांचे प्रयोग केले. या काळात मी अभिनय, आवाजातील चढ-उतार, हावभाव अशा गोष्टींवर काम केले. स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्यावर मी सिनेमाची वाट धरली.
जवळपास 100 सिनेमांत तुम्ही व्हिलनची भूमिका साकारली आहे. व्हिलनचीच भूमिका साकारायची हे तुम्ही आधीच ठरवले होते का?
होय. कारण मी जेव्हा सिनेमात आलो तेव्हा मी वयाची पस्तीशी ओलांडली होती. त्यामुळे हिरो व्हायचा चान्सच नव्हता. कोणत्याही सिनेमात मुख्य तीनच भूमिका असतात. हिरो, हिरोईन आणि व्हिलन यांच्याभोवतीच सिनेमाचे कथानक फिरते. त्यामुळे व्हिलनच्याच भूमिका साकारायचे मी ठरवले. गंमत म्हणजे बहुतेक सिनेमांत व्हिलनचे काम केल्यामुळे आजही लोक माझ्याशी बोलायला घाबरतात. पण त्या केवळ सिनेमातल्या भूमिका होत्या हे पटवून दिल्यानंतर ते रिलॅक्स होतात. व्हिलनच्याच भूमिकांनी मला इंडस्ट्रीत ओळख मिळवून दिली.
या क्षेत्रात नव्याने येणार्या कलाकारांना काय सांगाल?
– अभिनयाच्या क्षेत्रात ‘लंबी रेस का घोडा’ व्हायचे असेल तर कलाकारांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. प्रामाणिकपणे काम करण्याची आणि सतत नवनवीन शिकण्याची वृत्ती कायम असावी. आपण कुठे चुकतोय हे ओळखून ती चूक सुधारण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
आगामी सिनेमांविषयी…
– बालमजुरीवर आधारित ‘झलकी’ या सिनेमात मी दलालाची भूमिका साकारतोय. जो गाव खेड्यांतील लहान मुलांना शहरात नोकरीसाठी घेऊन जातो. त्यानंतर काही सिनेमांत मी सकारात्मक भूमिकेत आहे. ‘कमिंग बॅक डार्लिंग’ या मर्डर मिस्ट्री सिनेमात मी पोलिसाची भूमिका साकारतोय. त्यानंतर ‘जंक्शन वाराणसी’मध्ये मी डॉक्टरच्या भूमिकेत आहे. जो शहरातील झगमगाट सोडून गाव खेड्यात जाऊन लोकांची सेवा करतो. आगामी काळात प्रत्येक भाषेतल्या एका तरी सिनेमात काम करण्याची माझी इच्छा आहे.

























































