
>> मंगेश सौंदाळकर
मोटार बाईकच्या पेट्रोल टाकीपासून ते बॉलीवूडमधील कलावंतांच्या आलिशान बंगल्यापर्यंत झाडाझडती घेण्याचे सत्र नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने सुरूच ठेवले आहे. मुंबईतील ड्रग्ज तस्करांच्या नांग्या ठेचणारच, असा निर्धार एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी व्यक्त केला आहे. अनेकजण गजाआड झाले आहेत, तर आणखी अनेक एनसीबीच्या रडारवर आहेत. वानखेडेंशी साधलेला हा संवाद.
जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याशी संवाद
मुंबईत ड्रग्ज पेडलरवर झालेल्या कारवाया आणि त्यामुळे काय परिणाम झाला आहे?
– एनसीबीने मुंबईत ड्रग्ज तस्करांविरोधात कारवाई सुरूच ठेवली आहे. एनसीबीने मुंबईत या वर्षी 51 गुन्हे दाखल करून 200 जणांना अटक केली आहे. तस्करांकडून कोकेन, एमडी, एलएसडी, चरस, गांजा यांसारखे ड्रग्ज जप्त केले आहेत. मुंबईत ड्रग्जची तस्करी करणारे गँगस्टर चिकू पठाण, बबलू पटरी, सुलतान, बटाटा गॅंग सारख्या गॅंगस्टरला एनसीबीने अटक करून तुरुंगात पाठवले आहेत. एवढंच नव्हे, तर ड्रग्ज तस्करी करणाऱया 11 नायजेरियननादेखील एनसीबीने अटक केली आहे.
– ड्रग्ज तस्करीसाठी लहान मुलांचा वापर होऊ लागला आहे, त्याबाबत काय सांगाल…
– एनसीबी मोठय़ा पेडलरवर सतत कारवाई करत आहेत. कारवाईच्या भीतीने भूमिगत झालेले पेडलर हे आता ड्रग्ज तस्करीसाठी लहान मुलांचा वापर करू लागले आहेत. पेडलर हे मुलांना तस्करीच्या मोबदल्यात पैसे आणि नशा करण्यासाठी विविध ड्रग्ज देतात. एकदा का त्या मुलांना नशेची सवय झाली की, त्याचा फायदा घेत पेडलर हे मुलांकडून ड्रग्जची तस्करी करतात. लहान मुलांना एनसीबी किंवा पोलीस पकडत नाही हे त्या पेडलरला माहीत असते. एनसीबीने काही दिवसांपूवी कुर्ला येथे कारवाई केली होती. एक अटक केलेला पेडलर हा मुलांना कोडीन कफ सिरप देऊन ड्रग्ज तस्करी करत असायचा. काही पेडलर हे मुलांना एमडी देऊन त्यांना तस्करी करण्यास सांगतात. एमडीची नशा करण्यासाठी मुले हे त्या पेडलरच्या सांगण्यावरून ड्रग्ज देण्यासाठी जात असतात.
– जी मुले नशा करतात अशा मुलांचे काय?
– आजही युवा पिढी ही देशाची संपत्ती आहे. त्या संपत्तीचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे. जी मुले नशेच्या आहारी गेली आहेत अशा मुलांना विश्वासात घेऊन त्यांचे समुपदेशन केले जाते. समुपदेशनासाठी एनजीओची मदत घेतली जाते. ड्रग्जच्या सेवनाचे होणारे चांगले वाईट परिमाण त्यांना समजावून सांगितले जातात. त्या मुलांचे पुनर्वसन केले जाते. त्या मुलांना सुधारण्याची संधी दिली जाते. तरुण मंडळींना मी सांगू इच्छितो, ड्रग्जचे व्यसन करू नका. युवा पिढी ही देशाची संपत्ती आहे. देशासाठी चांगले काम करायचे आहे हे ध्येय डोळय़ासमोर ठेवून अमली पदार्थांच्या नशेकडे वळू नका. अमली पदार्थाची नशा ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबीयांसाठीदेखील तितकीच घातक आहेत. नशेचे होणारे परिणाम खूप वाईट असतात. तरुण मंडळींनो, देश तुमचा आहे. तुम्ही नशेला तुमच्यापासून दूरच ठेवा.
– झोपडपट्टय़ा ते उच्चभ्रू सोसायटीमध्ये ड्रग्ज घेणारे आणि ड्रग्ज विकणारे हे यांचे नेटवर्क कसे चालते?
– उच्चभ्रू ते झोपडपट्टय़ापर्यंत ड्रग्ज तस्करांचे जाळे पसरले आहे. झोपडपट्टय़ांमध्ये चरस, गांजा तर उच्चभ्रू सोसायटीमध्ये कोकेन, एलएसडी, ब्राऊन शुगरसारखे ड्रग्ज काही जण घेतात. एनसीबीच्या अशा लक्षात आले आहे की, झोपडपट्टय़ांमध्ये येणारा गांजा हा आंध्र प्रदेश, गुजरात येथून येत असतो, तर हेरॉईन उत्तर प्रदेश आणि अफगाणिस्तान येथून आणि एलएसडी हे युरोपियन देशातून येत आहेत. मोठे तस्कर हे छोटय़ा तस्करांना ड्रग्ज देतात. त्यानंतर छोटे तस्कर हे नशेबाजांना ड्रग्ज देतात. उच्चभ्रू सोसायटय़ांमध्ये तस्कर हे कधी नोकराच्या तर कधी इतर व्यक्तींच्या माध्यमातून ड्रग्जची तस्करी करत असतात.
ड्रग्जमाफियांची अंडरवर्ल्ड लिंक आणि ड्रग्ज फ्री महाराष्ट्र याबाबत काय सांगाल…
n ड्रग्ज फ्री सोसायटी हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानुसार आम्ही सतत ड्रग्ज पेडलरवर कारवाई करत आहोत. एनसीबी प्रत्येक महिन्याला 10 कारवाई करत आहेत. आतापर्यंत एनसीबीने 200 जणांना अटक केली आहे. ड्रग्ज तस्करीत सक्रिय असणारे मोठे पेडलर हे सध्या तुरुंगात आहेत. ड्रग्जबाबत आम्ही सतत जनजागृती करत आहोत. ड्रग्जमाफियांची अंडरवर्ल्ड लिंक ही तशी जुनीच आहे. सध्या नाका&s टेररिझम हा प्रकार सुरू आहे. ड्रग्ज तस्करांचे अंडरवर्ल्डशी असलेले नेटवर्क फार मोठे आहे. काळ्या धंद्यातील रक्कम ही काही माध्यमातून अंडरवर्ल्डपर्यंत पोहचवली जाते. परदेशातून आपल्याकडे येणाऱया विविध ड्रग्जसाठी काही रक्कम त्या त्या लोकांना द्यावी लागते. आमच्या एनसीबीच्या पथकाने थेट दुबईशी संबंध असलेल्या दाऊद टोळीतील काहीना गजाआड केले. डोंगरीमध्ये सुरू असलेली ड्रग्जची फॅक्टरी उध्वस्त केली.





























































