स्वागत दिवाळी अंकाचे

274

 मौज

परिसंवाद हे या अंकाचे वैशिष्टय़. बाळ फोंडके यांनी संयोजन केलेला ‘मी वैज्ञानिक का व कसा झालो’ या परिसंवादात जयंत नारळीकर, अनिल काकोडकर, रघुनाथ माशेलकर, सुरेश नाईक व स्वतः बाळ फोंडके या जगप्रसिद्ध अग्रगण्य वैज्ञानिकांच्या जीवन-पेरणांचा मागोवा घेतला आहे.  याशिवाय मुंबईच्या ऐतिहासिक संचिताच्या वारशाची ओळख करून देणारा भूगर्भशास्त्रज्ञ अश्विन पुंडलिक यांचा रंजक लेख आहे. मधू लिमये यांची बंडखोर प्रतिमा संयतपणे चितारणारा नरेंद्र चपळगावकर यांचा लेख तसेच महेश एलकुंचवार या ज्येष्ठ लेखकाच्या लेखनातील सौंदर्यस्थळे उलगडून दाखवणारा संजय आर्विकर यांचा समीक्षा लेख वाचनीय आहे.

संपादक : मोनिका गजेंद्रगडकर

मूल्य : 250 रु., पृष्ठे : 288

 

दर्याचा राजा

यंदाच्या या दिवाळी अंकात मच्छीमारांचा दीपस्तंभ (पंढरीनाथ तामोरे), कलामहर्षी सावळाराम हळदणकर (डॉ. माधव पोतदार), मराठी गझल (सदानंद डबीर), पालकत्वाचे आव्हान (समता गंधे), नैराश्यग्रस्तांना सावरा! (प्रमोद कांदळगावकर) हे लेख उत्तम आहेत. ज्ञानेश्वरीच्या सहवासात (डॉ. पांडुरंग भानुशाली), श्री मुंबादेवीचा आशीर्वाद (नीळकंठ रेवदंडकर) हे लेख माहितीपूर्ण आहेत. प्रचलित उपचार पद्धती, रुद्राक्ष, कॅन्सरचा दुश्मन – हळद हे लेख माहितीपूर्ण आहेत. काव्य विभाग डॉ. विजया वाड, उषा मेहता, सुधा दीक्षित, स्मिता माळवदे, शरद अत्रे आदी मान्यवरांच्या कवितांनी सजला आहे.

संपादक : पंढरीनाथ तामोरे

मूल्य : 75 रु., पृष्ठे : 172

 

चित्रलेखा

या दिवाळी अंकात ‘देशोदेशीचे कुबेर’ हा डॉ. अशोक राणा यांचा माहितीपूर्ण लेख आहे. गांधीजींचं समाजसेवेचे तत्त्वज्ञान संत तुकाराम महाराजांच्या अभंग तत्त्वज्ञानाला आदर्श मानणारं कसं होतं हा सचिन परब यांचा लेख, जामखेडसारख्या गावातून शिंपी ते चित्रकार, शिक्षक, चित्रपट निर्माता ते आमदार अशी यशस्वी आयुष्याची चढती कमान चढत जगभर भ्रमंती करणारे रामदास फुटाणे यांचा जीवनप्रवास सांगणरा लेख आहे. ऑल राऊंडर टपोरी ते इंटरनॅशनल चित्रकार सचिन खरात या तरुणाचा जिद्दी प्रवास थक्क करून टाकतो. याशिवाय दादू फडकर यांची धमाल बतावणी, गौरव यादव व जयदेव यांची हास्यचित्रे खुसखुशीत झाली आहेत.

संपादक : ज्ञानेश महाराव

मूल्य : 60 रु., पृष्ठे : 100

 

कलामंच

या अंकात डॉ. काशीनाथ घाणेकर या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींची भूमिका साकारणारी सोनाली कुलकर्णी हिच्याशी संवाद साधणारा अपूर्वा बापट यांचा लेख जुळून आलाय. मधुरा चव्हाण यांनी शिरीष पै यांच्या आठवणी सांगणारा लेख हृद्य झाला आहे. याशिवाय इंदिरा संतांच्या काव्यातील आस्वादकता (प्रा. डॉ. वेदश्री थिगळे), खानोलकर आठवताना (दिलीप देशपांडे), बालकवी आणि त्यांचं जग (रुचा सामंत), कॉमेडी किंग मेहमूद (मनोहर विश्वासराव) हे लेख उत्तम जमून आलेत. आरती प्रभू, महेश केळुसकर, प्रवीण दवणे, अनुपम बेहेरे, रामदास फुटाणे आदी अनेक नामवंत कवींच्या कविता या अंकात आहेत.

संपादिका : हेमांगी नेरकर

मूल्य : 70 रु., पृष्ठे : 188

 

मोहनगरी

यंदाचा हा अंक ‘चित्रतारका’ विशेषांक आहे. 1950 ते 1970 या दोन दशकांत रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणार्‍या वीस नायिकांना हा अंक समर्पित करण्यात आला आहे. या वीस तारकांचे चित्रपट-संगीत-गाणी लोकप्रियता त्यांच्या अभिनयाच्या विविध कक्षा त्यांच्या मर्यादा आणि काही प्रमाणात त्यांचे वैयक्तिक आयुष्य अंकात लेखकांनी प्रभावीपणे मांडले आहे. वंदना कुलकर्णी, सतीश जकातदार, रविमुकुल, श्रीपाद ब्रह्मे, प्रभाकर खोले, डॉ. वृषाली  किन्हाळकर, मानसी पटवर्धन, अप्पा देशपांडे, वसंत धूपकर, शुभदा सावकार आदींचे लेख अंकात आहेत.

संपादक : आनंद लाटकर

मूल्य : 250 रु., पृष्ठे : 208

 

संवाद

विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित या विशेषांकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त गांधी आणि विज्ञान-तंत्रज्ञान यावर विवेचन करणारे दोन लेख आहेत. यांसह विज्ञान साहित्यांबरोबरच डॉ. अनिल काकोडकर यांचे ‘संशोधन व विकास आणि भारत’ या विषयावरील भाषण, जलतज्ञ डॉ. माधवराव चितळे यांची मुलाखत, डॉ. अरविंद नातू यांच्याशी ‘आयसर’ संस्थेविषयी साधलेला संवाद, दीपक शिकारपूर यांचे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ यावरील विवेचन, डॉ. विनिता आपटे यांनी घेतलेला ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा आढावा. याशिवाय विज्ञान कथाही वाचायला मिळणार आहेत. त्यामुळे हा वैज्ञानिक-वैचारिक फराळ आपल्याला नक्की आवडेल.

संपादक : रेशमा जीवराज चोले

मूल्य : 100 रु., पृष्ठे : 108

 

अष्टपैलू

क्रीडा विषयाला वाहिलेल्या ‘अष्टपैलू’ या दिवाळी अंकाचे हे सलग नववे वर्ष होय. परिपूर्ण अशा क्रीडाविषयक दिवाळी अंकात क्रीडा साहित्याबरोबरच ललित साहित्याचीही फोडणी दिलेली आहे. जकार्ता आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांच्या आकर्षक मुखपृष्ठावरूनच हा अंक म्हणजे क्रीडाविषयक वाचनीय पर्वणी असल्याचा प्रत्यय येतो. यंदाच्या दिवाळी अंकात क्रीडा कथा, जकार्ता एशियाड, ऑलिम्पिक, क्रिकेट, हिंदुस्थानी खेळ, क्रीडा प्रेरणा, थोडसं मैदानाबाहेर आणि अध्यात्म या आठ विषयांवरील वाचनीय फराळाची मेजवानी वाढलेली आहे. लक्ष्मीकांत देशमुख, प्रा. संजय दुधाणे, डॉ. मिलिंद ढमढेरे, द्वारकानाथ संझगिरी, अंजली वेधपाठक यांच्या सुग्रास लेखणाने या दिवाळी अंकाचा गंध महाराष्ट्रभर दरवळला आहे.

संपादक : प्रा. संजय दुधाणे

मूल्य : 100 रु., पृष्ठे : 80

 

मेनका

सध्या देशभरात गाजत असलेल्या ‘मी टू’ प्रकरणावर मार्मिक भाष्य करणार्‍या कथा हे मेनका दिवाळी अंकाचे वैशिष्य आहे. लेख, कथा, कथालेख, मुलाखत आणि राशीभविष्य अशा साहित्य फराळासह मेनका कथा स्पर्धा विजेत्या कथांचाही यात समावेश आहे.  लक्ष्मीकांत देशमुख, रोहिणी निनावे, विभावरी देशपांडे, गुरूनाथ तेंडुलकर यांच्या कथा आणि कल्पिता राजोपाध्ये यांनी मांडलेला ‘दास्तान-ए-गुलबकावली’ या कथालेखाची मेजवानी मेनकात आहे.

संपादक : अमित टेकाळे

मूल्य : 200 रु., पृष्ठे : 248

आपली प्रतिक्रिया द्या