एडीआर आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याचा तपास सुरू, रोहितने रिल सीन रिअल केला

पवई येथील ओलीस प्रकरणाचे बारकावे आता पुढे येऊ लागले आहेत. रोहित आर्या याने हे कांड का केले ते अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्याने पद्धतशीर कट रचून हे घडवून आणले होते. गुन्हे शाखेची दोन पथके या प्रकरणाचा दोन दिशेने तपास करीत आहेत. तपासाअंतीच सर्व बाबी स्पष्ट होतील असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.

वेब सीरिजसाठी ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने रोहित आर्या या माथेफिरूने 17 मुलांना मुंबईत बोलावले होते. पवईच्या महावीर इमारतीमधील या स्टुडिओत त्याने चार दिवस मुलांचे ऑडिशन घेतले. चार दिवसांनी त्या स्टुडिओची मुदत संपली होती, पण गुरुवारी रोहितने एक दिवस वाढवून घेतला होता. आणि नेमके पाचव्या दिवशीच त्याने चार दिवस चाललेल्या अपहरणाच्या रिल सीनचे रियल सीनमध्ये रूपांतर केले होते.

मुंबईतील स्टुडिओची चौकशी करा

पवईतील घटनेनंतर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने मुंबईत ऑडिशन्स घेणाऱया सर्व स्टुडिओची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुंबईतील शेकडो स्टुडिओ दररोज ऑडिशन्स घेतात, ज्यामुळे चित्रपट उद्योगात काम करण्याचे स्वप्न पाहणाऱया हजारो नवोदित कलाकारांना आकर्षित केले जाते. मुंबईत अशा घटना इतक्या सहजपणे घडू शकतात, तर याचा अर्थ असा की प्रत्येक इच्छुक कलाकाराचे जीवन धोक्यात आहे, असे असोसिएशनचे अध्यक्ष सुंदर श्यामलाल गुप्ता म्हणाले.

अपहरणाचा सीन करायचा असल्याचे सांगत चार दिवस त्याने मुलांकडून तसेच करून घेतले, पण पाचव्या दिवशी रोहितने नाटय़ाचे रूपांतर वास्तवात आणले याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

त्यावेळी नेमके काय घडले ते अस्पष्ट

पवई पोलीस ठाण्याचे सपोनि अमोल वाघमारे यांच्यासह अन्य दोघे आतमध्ये घुसले होते. त्यानंतर वाघमारे आणि रोहित यांच्यात नेमके काय बोलणे झाले? असे काय घडले, की वाघमारे यांनी रोहितला गोळी झाडली ते नेमके अद्याप स्पष्ट नसल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी नियमानुसार न्यायालयीन चौकशी होईल. रोहित असे काही कांड करणार होता हे त्याच्या कुटुंबीयांना तसेच मित्रांना माहीत होते का याचा तपास पोलीस करत आहेत. त्याने नेमके कोणते केमिकल कधी आणले होते? एअरगनदेखील कुठून घेतली होती? रोहितने व्हिडीओत म्हटल्याप्रमाणे  अन्य व्यक्ती कोण आहेत याचाही पोलीस तपास करत आहेत.

आर्याने मराठी कलाकारांशी केला होता संपर्क

रोहित आर्याने मला पवई येथे येण्यासाठी संपर्क साधला होता, असा दावा मराठी अभिनेत्री रुचिता जाधवने केला आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये संभाषणाचे स्क्रीनशॉट शेअर करत रुचिता म्हणाली, ‘4 ऑक्टोबरला मला रोहित आर्याने चित्रपटासाठी संपर्क साधला. चित्रपटात काही मुलांना ओलीस ठेवण्याचा सीन असल्याचे त्याने सांगितले. 23 ऑक्टोबरला त्याने मला कधी भेटायचे विचारले. 27 ऑक्टोबरला त्याने मला पवईच्या आरए स्टुडिओचे लोकेशन पाठवले. माझ्या घरी इमर्जन्सी असल्याने मी जाऊ शकले नाही. आज मी जेव्हा बातमी पाहिली तेव्हा मला धक्का बसला.