आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी चिदंबरम यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अखेर सीबीआयने अटक केली. मंगळवारपासून बेपत्ता असलेले चिदंबरम 27 तासांनंतर अचानक मीडियासमोर काँग्रेस मुख्यालयात हजर झाले. त्यानंतर जोरबाग निवासस्थानी हाय होल्टेज ड्रामा झाला. सीबीआय अधिकाऱ्यांना गेटवरून उडय़ा मारून घरात प्रवेश करावा लागला. 52 मिनिटांच्या चौकशीनंतर रात्री 9.55 वाजता चिदंबरम यांना घरातूनच ताब्यात घेण्यात आले. उद्या गुरुवारी त्यांना सीबीआय कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सरकारविरुद्ध घोषणाबाजी करीत गोंधळ घातला.

congress-protest-against-ch

आयएनएक्स मीडिया घोटाळय़ात दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. चिदंबरम मंगळवारी सायंकाळी 5 पासून बेपत्ता होते. आज सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ सुनावणीस नकार दिला. शुक्रवारी (दि. 23) सुनावणी होईल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. दिवसभरातील या घडामोडींनंतर रात्री 8 पासून  काँग्रेस मुख्यालय आणि जोरबाग येथील चिदंबरम यांच्या निवासस्थानी  हायहोल्टेज ड्रामा सुरू झाला.

cbi-officers-at-chidambaram

मीडियासमोर निवेदन केल्यानंतर चिदंबरम तत्काळ काँग्रेस मुख्यलयापासून जवळच असलेल्या आपल्या निवासस्थानी पोहचले आणि गेट, दरवाजे बंद करण्यात आले.

chidmbaram-pc-with-abhishek

सीबीआयचे पथक मागावरच होते. काँग्रेस मुख्यालयातून हे पथक जोरबाग निवासस्थानी पोहचले. काँग्रेस कार्यकर्तेही तेथे पोहचले आणि ठिय्या मांडला. मोदी सरकारविरुद्ध घोषणाबाजी करीत गोंधळ घातला. सीबीआय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली गेली.

chidambaram-seating-in-poli

सुरुवातीला पोलिसांची कुमक कमी होती. रात्री नऊच्या सुमारास वरिष्ठ पोलीस अधिकारी, फौजफाटा दाखल झाला. काँग्रेस कार्यकर्ते आणि चिदंबरम समर्थकांना हटविण्याचा प्रयत्न केला.

congress-party-worker-prote

वकिलांसोबत खटल्याची तयारी करीत होतो

मी फरार असल्याचे चित्र काल रात्रीपासून रंगविण्यात येत होते. मी बेपत्ता झालो नव्हतो, तर हा खटला लढण्यासाठी मी वकिलांसोबत तयारी करीत होतो. त्यामुळे मी मीडियासमोर येऊ शकलो नाही, असा खुलासा चिदंबरम यांनी केला. स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलभूत आधार आहे. जीवन की स्वातंत्र्य यापैकी मला निवडण्यास सांगितले तर मी स्वातंत्र्य निवडेन, असेही चिदंबरम म्हणाले.

chidambaram-press-conferenc

आज सीबीआय न्यायालयासमोर हजर करणार

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना बुधवारी रात्री अटक करून सीबीआय मुख्यालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्यावरील आरोपांची माहिती त्यांना देण्यात आली. उद्या गुरुवारी सीबीआय न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात येणार आहे.

11 वकिलांची फौज

चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन मिळावा आणि आजच सुनावणी व्हावी यासाठी अकरा वकिलांची फौज प्रयत्न करीत होती. यामध्ये निष्णात वकिल असलेले कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासह इंदिरा जयसिंग आदींचा समावेश आहे. स्वतः चिदंबरम, त्यांच्या पत्नी नलिनी हेसुद्धा प्रसिद्ध वकील आहेत. एवढय़ा नामवंत वकिलांची फौज असतानाही चिदंबरम यांना आज दिलासा मिळाला नाही. अटक टाळण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.

सरकारकडून सत्तेचा गैरवापर – राहुल गांधी

पी. चिदंबरम यांचे चारित्र्यहनन करण्यासाठी मोदी सरकारकडून ईडी, सीबीआय आणि काही कणाहीन माध्यमांचा वापर केला जात आहे. सरकार सत्तेचा गैरवापर करीत आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान, चिदंबरम यांच्या समर्थनार्थ सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांच्यासह अनेक काँग्रेस नेते पुढे आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात काय झाले?

उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळावी आणि चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन द्यावा यासाठी कपिल सिब्बल यांनी आज धावाधाव केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्टर्सनी  चिदंबरम यांच्या याचिकेवर शुक्रवारी (दि. 23) सुनावणी करण्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी निर्णय घेतल्याचे सिब्बल यांना कळविले.

सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यांच्याबरोबर ज्येष्ठ विधिज्ञ, सलमान खुर्शीद, इंदिरा जयसिंग, विवेक तानखा आदी वकिल होते.

जेवणाच्या सुट्टीनंतर कोर्टाचे कामकाज सुरू होताच सिब्बल यांनी सरन्यायाधीश गोगोई यांच्यासमोर आजच सुनावणी घ्यावी अशी विनंती केली. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले, आता याचिकांची छाननी झालेली आहे. छाननीशिवाय सुनावणी होऊ शकत नाही. सॉरी मिस्टर सिब्बल आज सुनावणी होणार नाही.

काय आहे आयएनएक्स मीडिया घोटाळा…

3500 कोटी रुपयांचा एअरसेल-मॅक्सिस करार आणि आयएनएक्स मीडिया प्रकरणात 305 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत अनियमितता असल्याच्या प्रकरणात चिदंबरम यांचे नाव आल्याने ते चौकशी एजन्सीजच्या रडारवर आले होते. आयएनएक्स मीडियाने आयएनएक्स न्यूज या नवीन कंपनीत 26 टक्के गुंतवणूक करताना परकीय गुंतवणूकदारांना समभागांची विक्री 800 रुपये दराने केली. हे नियमबाहय़ होते. त्यामुळे केवळ 4.62 कोटी रुपयांची परवानगी असताना परकीय गुंतवणूक 305 कोटींपर्यंत पोहोचली.

स्पेनमध्ये टेनिस क्लब, ब्रिटनमध्ये अलिशान बंगला

आयएनएक्स मीडियाला विदेशी गुंतवणूक मंडळाकडून बेकायदेशीररीत्या 2007 मध्ये मंजुरी देताना तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी 305 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा ‘ईडी’चा आरोप आहे. या लाच घेतलेल्या पैशातून चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांनी स्पेनमध्ये 15 कोटी रुपयांना टेनिस क्लब आणि बार्सिलोनामध्ये जमीन खरेदी केली. तसेच ब्रिटनमध्ये अलिशान बंगला खरेदी केला. टेनिस क्लब आणि बंगल्याची एकत्रित किंमत 54 कोटी रुपये असल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे.

‘ईडी’ आणि सीबीआयने कार्ती चिदंबरम यांना यापूर्वी अटक केली होती. तसेच कार्ती यांची इंडियन ओवरसीज बँकेतील 9.23 कोटी रुपयांची एफडी आणि चेन्नईतील डीसीबी बँकेतील 90 लाख रुपयांची एफडी सील केली आहे.

दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

  • रात्री 8.15-काँग्रेस मुख्यालयातील पत्रकार परिषदेत अचानक चिदंबरम आले आणि पत्रकारांसमोर लिखित निवेदन वाचून दाखवले.
  • रात्री 8.21-निवेदनानंतर तडक घराकडे रवाना.
  • रात्री 8.35-सीबीआयचे पथक चिदंबरम यांना ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस मुख्यालयाच्या दिशेने रवाना.
  • रात्री 9.00-चिदंबरम आपल्या नवी दिल्लीतील जोरबाग या निवासस्थानी दाखल.
  • रात्री 9.05-सीबीआयच्या वाहनांचा ताफा काँग्रेस मुख्यालय सोडून चिदंबरम यांच्या घराच्या दिशेने वळला.
  • रात्री 9.10-सीबीआय पथक चिदंबरम यांच्या घराबाहेर धडकले, पण मुख्य दरवाजा बंद असल्याने कुंपणावरून उडय़ा मारून अधिकारी घरात गेले.
  • रात्री 9.15-घराबाहेर काँग्रेस समर्थकांचा राडा.
  • रात्री 9.55-चिदंबरम यांना ताब्यात घेऊन सीबीआय पथक मुख्यालयाच्या दिशेने रवाना.