
इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशन (आयपीजीए) या हिंदुस्थानातील कडधान्यांच्या व्यापार आणि उद्योगातील शिखर संस्थेने देशी आणि काबुली चण्यांबाबत नॉलेज सिरीज वेबिनारचे आयोजन केले होते. त्यात 25 देशांमधील 850 पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. या वेबिनारमध्ये काबुली चण्यांचे उत्पादन, हिंदुस्थान आणि इतर मोठ्या प्रदेशांतील उत्पादन, नाफेडची खरेदी, साठवणुकीची आणि विक्रीची धोरणे, चण्याचे पीएमजीकेवाय योजनेअंतर्गत मोफत वितरणाचे परिणाम, काबुली चण्यांच्या जागतिक आणि हिंदुस्थानी किंमतींचा दृष्टीकोन, चण्याची निर्यात आणि मागणीचे स्वरूप, हिंदुस्थानचे आयात धोरण आणि दरपत्रक, काबुली चणा- उत्पादन आणि निर्यात इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.
या चर्चासत्रात सहभागी झालेल्या दिग्गज वक्त्यांमध्ये उद्योगातील आघाडीचे मान्यवर आणि या क्षेत्रांतील तज्ज्ञ होते. त्यात आंतरराष्ट्रीय वक्ते जसे डॉ. एन. पी. सिंग (संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पल्सेस रिसर्च), सुनीलकुमार सिंग (अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक, नाफेड), गौरव बगडाई (प्रवर्तक, जी पी अॅग्री), संजीव दुबे ( संचालक, ग्रेन ट्रेंड प्रा. लि., ऑस्ट्रेलिया), जयेश पटेल (समूह सीईओ आणि कार्यकारी सदस्य, बजरंग इंटरनॅशनल ग्रुप, यूएई), केम बोगुसोग्लू (जागतिक प्रमुख- पल्सेस ट्रेडिंग, जी पी ग्लोबल ग्रुप, यूएई) आणि नवनीत सिंग छाब्रा (संचालक, शीला इंटरनॅशनल, इंडिया) इत्यादींचा समावेश होता. या वेबिनारचे सूत्रसंचालन जी. चंद्रशेखर (ख्यातनाम अर्थतज्ज्ञ, ज्येष्ठ संपादक, धोरण प्रवक्ते आणि कृषी व्यवसाय तज्ज्ञ) यांनी केले.
आयपीजीएचे उपाध्यक्ष विमल कोठारी यांनी प्रस्तावनेत सांगितले की, ”देशातील कडधान्ये जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनवण्यासाठी आमच्या उपक्रमांना अधिक गती देणे गरजेचे आहे, जेणेकरून देशतील कडधान्ये जगभरात स्पर्धात्मक होतील.” इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पल्सेस रिसर्चचे संचालक डॉ. एन. पी. सिंग चण्यांच्या परिस्थितीतील बदलाबाबत सांगताना म्हणाले की, काबुलीचण्यांनी देशातील डाळींच्या क्रांतीला प्रत्यक्षात आणणे शक्य झाले असून डाळींबाबत हिंदुस्थान जवळपास स्वयंपूर्ण झाला आहे. उत्तम तंत्रज्ञान विकास, दर्जेदार बियाण्यांची वाढीव उपलब्धता आणि त्याचबरोबर सुयोग्य सरकारी धोरणे यांच्यामुळे देशात चण्यांची क्रांती घडून आली आहे. उत्तम हवामानाची परिस्थिती आणि वाढीव एमएसपीमुळे, तूर, उडीद आणि मूग यांच्या या वर्षातील खरीप पिकाच्या उत्पादनात 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नाफेडचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक सुनील कुमार सिंग म्हणाले की, “देशी चणे उत्पादन आणि वापराच्या बाबतीत केंद्रस्थानी येतील. आम्ही मागील तीन वर्षांत मोठ्या प्रमाणावर देशी चण्यांचा साठा घेतला आहे. सरकारच्या अलीकडील धोरण निर्णयांमुळे बाजाराला स्थैर्य येणार आहे. तीन महिन्यांपूर्वी प्रति क्विंटल 3800 ते 4000 रूपये क्विंटलला विकत असलेला चणा सध्या नाफेड प्रतिक्विंटल 4350 ते 4500 रूपये क्विंटलने विकत आहे.”
वेबिनारचे संयोजकजी. चंद्रशेखर यांनी सांगितले की, ”आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला एक अत्यंत चांगली स्थिती दिसत असून ऑस्ट्रेलिया आणि रशिया यांच्यादरम्यान मोठी स्पर्धा लागल्याचे दिसते. या दोन्ही देशांनी पिके चांगली घेतली असून त्यांच्या किंमतीत फक्त 100 यूएसडीचा फरक आहे. या दोघेही किमतींसाठी थांबू शकतात आणि दीर्घकाळ साठा करू शकतात. मात्र, ऑस्ट्रेलियन शेतकरी दोन वर्षांच्या दुष्काळातून बाहेर येत असून त्यांना पैशांची गरज आहे. त्यामुळे परिस्थितीवर लक्ष ठेवावे लागले.” आयजीपीएचे सचिव सुनील सावला यांनी सांगितले की, ”हा वेबिनार या टप्प्यावर सुसंगत होता. सध्याची बाजारातील स्थिती समजून घेणेच नाही तर देशी चणे आणि काबुली चणे यांच्या स्थानिक बाजारपेठेतील किमतीही समजून घेणेही अत्यंत महत्त्वाचे होते. कडधान्याबाबत देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकता येणार आहे.” आयपीजीएकडून आयपीजीए नॉलेज सिरीजमधील पुढील वेबिनारचे आयोजन 11 सप्टेंबर 2020 रोजी लेंटिल्स (मसूर) या विषयावर आयोजित केला जाईल आणि लवकरच या वेबिनारच्या उपस्थितीसाठी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे.
काय आहे आयपीजीए
देशातील डाळी आणि धान्य व्यापार व तत्संबंधी उद्योगांची मध्यवर्ती संस्था असलेल्या इंडियान पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनचे (आयपीजीए) 400 हून अधिक थेट व अप्रत्यक्ष सभासद आहेत., ज्यांत व्यक्ती, कॉर्पोरेट्स तसेच स्थानिक डाळ व्यापारी आणि प्रोसेसर्सच्या संघटनांचा समावेश आहे. या सदस्यांच्या माध्यमातून ही संघटना डाळींचे उत्पादन, प्रक्रिया, धान्य साठवणूक आणि आयात उद्योग अशा संपूर्ण मूल्यसाखळीचा भाग असलेल्या 10 हजार लाभार्थींशी जोडली गेली आहे. डाळी आणि धान्य उद्योग व व्यापार जागतिक स्तरावरील स्पर्धेत टिकून राहण्यास सक्षम बनावा, व हे ध्येय साध्य करताना देशाच्या अन्न व पोषण सुरक्षेलाही बळ मिळावे हे आयपीजीएचे लक्ष्य आहे.































































