
अॅपल कंपनी दरवर्षी सप्टेंबर महिन्यात आपली आयफोनची नवीन सीरिज लाँच करते. चाहत्यांना आता आयफोन 17 सीरिजची उत्सुकता लागलेली आहे, परंतु या सीरिज आधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ बॉम्ब फोडला आहे. या टॅरिफचा थेट परिणाम आयफोनच्या नव्या सीरिजवर होणार आहे. यामुळे एक ते दीड लाखात मिळणारा आयफोन आता महाग मिळू शकतो. 50 टक्के टॅरिफमुळे आयफोन 17 च्या सीरीजमधील फोनच्या किंमत 50 डॉलर ते 150 डॉलरपर्यंत वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
अॅपलने चीन-अमेरिका वॉरपासून वाचवण्यासाठी चीनमधून बाहेर पडत हिंदुस्थानात आयफोनचे उत्पादन बनवणे सुरू केले होते, परंतु आता ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर थेट 50 टक्के टॅरिफ लावला आहे. याचा फटका अॅपल कंपनीला बसणार आहे. हिंदुस्थान आणि चीन या दोन्ही देशांवर ट्रम्प नाराज असल्याने अॅपलने आता अमेरिकेत 100 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी नुकतीच डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेत ही घोषणा केली. अमेरिकन सरकारला खूश करण्यासाठी आणि भविष्यात टॅरिफपासून सुटका करण्यासाठी अॅपल कंपनीने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.