
यंदाच्या आयपीएलचा थरार 19 सप्टेंबरपासून यूएईत रंगणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे आठही संघ सज्ज होत आहेत. मात्र प्रेक्षकांविना खेळवण्यात येणाऱ्य़ा स्पर्धेत क्रिकेटपटू तसेच संबंधित अधिकाऱयांसाठी कडक नियम तयार करण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या सर्वांनाच ‘बायो बबल’मध्ये राहावे लागणार आहे. याचा अर्थ आयपीएलशी संबंधित सर्वांसाठीच हॉटेल ते स्टेडियमपर्यंतच मर्यादा ठेवण्यात आली आहे. खेळाडू, सपोर्ट स्टाफ, अधिकारी यांच्या एकूण 20 हजारांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत. याप्रसंगी आरोग्य व सुरक्षा या दोन्हीला प्राधान्य देण्यात आल्याचे स्पर्धेचे मेडिकल पार्टनर यांच्याकडून सांगण्यात आले.
3500 टेस्ट पूर्ण
आठ संघांमधील जवळपास 200 क्रिकेटपटू गेल्या महिन्यात यूएईत दाखल झाले. त्यांना सहा दिवस क्वारंटाइन राहावे लागले. खेळाडू, सपोर्ट स्टाफ, सामनाधिकारी, पंच, संबंधित पदाधिकारी या सर्वांनाच यूएईत पाऊल ठेवताच कोरोना चाचणीचा सामना करावा लागला. दोन दिवसांनंतर पुन्हा त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना ‘बायो बबल’ अर्थातच सुरक्षित वातावरणात ठेवण्यात आले. आतापर्यंत 3500 कोरोना चाचणी करण्यात आल्याचे अबुधाबीमधील स्पर्धेचे अधिकृत मेडिकल पार्टनर व्हीपीएस हेल्थकेअरकडून स्पष्ट करण्यात आले.
स्टार वाहिनीचा 60 दिवसांचा प्लॅन
आयपीएलचा धमाका यूएईत पाहायला मिळणार असला तरी या स्पर्धेतील लढतींचे समालोचन मुंबईतूनही होणार आहे. स्टार वाहिनीने लोअर परळ येथील स्टुडिओमध्ये सर्व तयारीही केली आहे. यासाठी 800 ते 1000 व्यक्तींचा ताफा या स्पर्धेसाठी सज्ज झालाय. या सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. सलग दोन महिने अर्थातच 60 दिवस कुटुंबापासून दूर राहिल्यामुळे मानसिक त्रास जाणवल्यास त्यांना यामधून बाहेर काढण्यासाठी मेडिकल टीमही तयार करण्यात
आली आहे.



























































