IPL 2026 सुरू होण्यापूर्वीच BCCI ची मोठी घोषणा, दोन सामन्यांसह इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर; वाचा सविस्तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

IPL 2026 च्या रणधुमाळीपूर्वीच क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने (BCCI) हिंदुस्थानच्या आयर्लंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले असून, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जून महिन्यात दोन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 26 जून रोजी बेलफास्टमध्ये पहिला सामना होईल, तर 28 जून रोजी दुसरा सामना पार पडेल. विशेष म्हणजे, बेलफास्टच्या सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबवर हिंदुस्थानचा संघ आपला पहिला टी-20 सामना खेळणार असून, यापूर्वी 2007 मध्ये येथे टीम इंडियाने शेवटचा वनडे सामना खेळला होता.

आयर्लंडचा दौरा संपल्यानंतर टीम इंडिया लगेचच इंग्लंडला रवाना होईल. 1 जुलैपासून हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका सुरू होणार आहे. या मालिकेचा शेवटचा सामना 11 जुलै रोजी ‘द एजस बाउल’ येथे खेळवला जाईल. अशाप्रकारे टीम इंडिया अवघ्या 13 दिवसांच्या कालावधीत एकूण 7 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणार आहे. आयपीएलचा थरार 28 मार्चपासून सुरू होत असून, या व्यस्त वेळापत्रकामुळे खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर सर्वांचे लक्ष असेल.

IPL 2026 – सलामीवीर म्हणून कोण आहे वरचढ? विराट कोहली की रोहित शर्मा; जाणून घ्या एका क्लिकवर…

टीम इंडिया सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्यांनी नुकताच अहमदाबादमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून तिसरा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. सलग दोनदा टी-20 विश्वचषक जिंकणारा आणि मायदेशात हे जेतेपद पटकावणारा हिंदुस्थान हा जगातील पहिला देश ठरला आहे. आयर्लंडविरुद्धच्या ऐतिहासिक आकडेवारीवर नजर टाकल्यास, टीम इंडियाचे पारडे जड आहे. आतापर्यंत झालेल्या 8 टी-20 सामन्यांत टीम इंडियाने निर्विवाद वर्चस्व गाजवलं असून आयर्लंडला एकदाही हिंदुस्थानवर विजय मिळवता आलेला नाही.