
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 11 एप्रिल रोजी होणाऱ्या आयपीएल 2026 च्या सामन्यापूर्वी चेन्नईसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसने आपल्या दुखापतीतून सावरून मैदानात परतण्याचे संकेत दिले आहेत. हंगामाच्या सुरुवातीला सराव सत्रादरम्यान ब्रेव्हिसच्या बरगडीला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला चेन्नईच्या सुरुवातीच्या तीन सामन्यांना मुकावे लागले. मात्र, मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी ब्रेव्हिसच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची पुष्टी केली असून, तो 11 एप्रिलच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करण्याची दाट शक्यता आहे.
चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी ब्रेव्हिसला 2.20 कोटी रुपयांना कायम ठेवले होते. गेल्या हंगामात बदली खेळाडू म्हणून संधी मिळाल्यावर त्याने 180 च्या स्ट्राईक रेटने 225 धावा कुटून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. नुकत्याच चेन्नईत झालेल्या एका कार्यक्रमात ब्रेव्हिस ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि आयुष म्हात्रे यांच्यासोबत दिसला. यावेळी चाहत्यांना संदेश देताना तो म्हणाला, “11 तारखेला भेटूया… प्रत्येक सामन्यात आणि आम्ही जिथे कुठे खेळू तिथे.” त्याच्या या विधानामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Dewald Brevis is coming back next game 🥳💛 pic.twitter.com/1sur5rHTyh
— Beast (@Beast__07_) April 8, 2026
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जची या हंगामातील सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. संघाने आतापर्यंत खेळलेले तिन्ही सामने गमावले असून, ते सध्या गुणतालिकेत तळाला आहेत. चेन्नईचा नेट रन रेट उणे 2.517 इतका खाली घसरला आहे. अशा कठीण परिस्थितीत ब्रेव्हिसचे पुनरागमन संघाच्या मधल्या फळीला बळकटी देऊ शकते. चेन्नई आणि दिल्ली यांच्यातील हा सामना चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर रंगणार असून, घरच्या मैदानावर विजय मिळवून गुणतालिकेत खाते उघडण्याचे आव्हान चेन्नईसमोर असणार आहे.



























































