IPL 2026 – शेवटचे दोन चेंडू दिल्लीकरांच्या जिव्हारी लागले; पण डेव्हिड मिलरच्या ‘त्या’ निर्णयाचे सुनील गावसकरांकडून समर्थन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

IPL 2026 मध्ये बुधवारी (08 एप्रिल 2026) दिल्लीकरांना थरारक सामना पाहायला मिळाला. शेवटच्या दोन चेंडूंवर दोन धावांची गरज असताना डेव्हिड मिलरने (41*) धाव घेण्यास नकार दिला आणि स्वतः सामना संपवण्याचा धाडसी निर्णय घेतला. डेव्हिड मिलर चौकार किंवा षटकार ठोकणार, अशी चाहत्यांसह संघाला अपेक्षा होती. मात्र, प्रसिद्ध कृष्णाने टाकलेला स्लो बाऊन्सर मिलरला खेळता आला नाही आणि शेवटच्या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात कुलदीप यादव धावबाद झाला आणि एका धावेने गुजरातचा संघ विजयी झाला. या पराभवानंतर मिलरवर टीका होत असली तरी, हिंदुस्थानचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी त्याची बाजू सावरली आहे. मिलरचा हेतू योग्य होता आणि त्याने स्वतःवर विश्वास दाखवला, यात काहीही चुकीचे नाही, असे गावसकर यांनी ‘जिओ हॉटस्टार’वर बोलताना स्पष्ट केले.

गावसकर यांनी मिलरच्या मानसिकतेचे कौतुक केले असले तरी, मोक्याच्या क्षणी खेळाची समज किती महत्त्वाची असते हे देखील अधोरेखित केले. 1986 मधील हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया ऐतिहासिक टाय कसोटीचा संदर्भ देत त्यांनी रवी शास्त्रींच्या संयमी खेळाची आठवण करून दिली. “अशा दबावाच्या परिस्थितीत धाव घेऊन धावसंख्या बरोबरीत साधणे हा अधिक सुरक्षित पर्याय असू शकला असता,” असे मत गावसकर यांनी व्यक्त केले. एकीकडे मिलरच्या आत्मविश्वासाचे समर्थन करतानाच, दुसरीकडे त्यांनी परिस्थितीनुसार निर्णय घेण्याच्या गरजेवरही बोट ठेवले.

मी सामना संपवू शकत नाही… विराट कोहलीशी तुलना करताच बाबर आझम संतापला; रिपोर्टरला फटकारले

दुसरीकडे, गुजरात टायटन्सने या विजयासह हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला. या विजयात फिरकीपटू रशीद खानने 17 धावांत 3 बळी घेत मोलाची भूमिका बजावली. माजी इंग्लिश फलंदाज केविन पीटरसनने रशीदच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले, मात्र गुजरातच्या एकूण गोलंदाजीवर त्याने नाराजी व्यक्त केली. गुजरातने सामना अधिक चांगल्या पद्धतीने संपवायला हवा होता आणि त्यांची गोलंदाजी अजूनही पूर्ण लयीत वाटत नसल्याचे पीटरसनने नमूद केले. दरम्यान, सामन्यानंतर अक्षर पटेलने निराश झालेल्या मिलरचे सांत्वन केल्याने क्रीडाप्रेमींची मने जिंकली.